प्लेऑफची शर्यत रंगतदार स्थितीत
#मुंबई
आयपीएल-१६ मधील साखळी टप्प्यातील ५२ सामने संपल्यानंतर एकही संघ प्लेऑफसाठी अद्याप पात्र ठरलेला नाही. १६ गुणांसह तालिकेत सध्या टाॅपवर असलेला गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सर्व संघांची स्थिती बघता १० पैकी एकही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही.
स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक संघाला १४ साखळी सामने खेळायचे आहेत. आजघडीला लीगमधील सर्व संघ प्रत्येकी १० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. गुजरात (११ सामन्यात १६ गुण), चेन्नई (११ सामन्यांत १३ गुण) आणि लखनौ (११सामन्यांत ११ गुण) हे संघ अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर विराजमान आहेत. त्यानंतर राजस्थान, बंगलोर, मुंबई आणि पंजाब या संघांचे प्रत्येकी १० गुण आहेत. कोलकाता, हैदराबाद आणि दिल्ली या उर्वरित तीन संघांचे प्रत्येकी ८ गुण आहेत. साखळी टप्प्यातील ७० पैकी १८ सामने बाकी आहेत. या उर्वरित सामन्यांतून संघांची प्लेऑफ पात्रता निश्चित होईल. १६ पेक्षा जास्त गुण मिळवणारा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. १४ पेक्षा कमी गुण मिळवणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्सने रविवारी (दि. ७) झालेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सचा ५६ धावांनी पराभव केला. या संघाने ११ सामन्यांत आठवा विजय नोंदवला. सध्या १६ गुण नावावर असलेला हा संघ प्लेऑफच्या दारात असला तरी हे निश्चित झालेले नाही. गुजरातचे मुंबई, हैदराबाद आणि बंगलोरविरुद्ध असे तीन सामने बाकी आहेत. यापैकी एक सामना जिंकला तरी हा संघ १८ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. तिन्ही सामने गमावल्यास मात्र गुजरातला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. सर्व सामने जिंकल्यास हा संघ पहिल्या क्रमांकावर राहून क्वालिफायर-१ मध्ये पोहोचू शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ ११ सामन्यांत ४ विजय, ४ पराभव अशी कामगिरी करीत १३ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एक सामना रद्द झाला होता. आता चेन्नईचे तीन सामने बाकी आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकताच हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. एकच सामना जिंकल्यास संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. तिन्ही सामने हरला तर मात्र चेन्नईवर स्पर्धेबाहेर होण्याची वेळ येईल.
लखनौ सुपरजायन्ट्स
गुजरातकडून ५६ धावांनी पराभूत झाल्यानंतर लखनौचे ११ सामन्यांत ११ गुण आहेत. या संघाने ५ सामने जिंकले, तर चेन्नईविरुद्धचा एक सामना अनिर्णित राहिला. हा चेन्नईनंतर संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौला आपल्या उर्वरित तीन लढतींत हैदराबाद, मुंबई आणि कोलकाताविरुद्ध खेळायचे आहे. तिन्ही सामने जिंकल्यास हा संघ १७ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरेल. मात्र, लखनौने एक जरी सामना गमावला तर प्लेऑफसाठी या संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. उर्वरित तीनपैकी दोन किंवा अधिक सामने गमावले तर लखनौ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल.
राजस्थान राॅयल्स
हैदराबादविरुद्ध रोमहर्षक लढतीत राजस्थानला रविवारी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. संघाने ५ पैकी ४ सामने जिंकून दणदणीत सुरुवात केली. मात्र गेल्या ६ पैकी ५ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे राजस्थानचे गणित बिघडले. सध्या त्यांचे ११ सामन्यांत ११ गुण आहेत. राजस्थानचे कोलकाता, बंगलोर आणि पंजाबविरुद्ध सामने बाकी आहेत. हे तिन्ही सामने जिंकल्यास हा संघ १७ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवेल. मात्र यासाठी त्यांना आपली धावगती उर्वरित संघांपेक्षा सरस ठेवणे क्रमप्राप्त आहे. तीनपैकी एक सामना गमावल्यास नंतर संघाला रनरेटसह इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. दोन किंवा अधिक सामने गमावले तर राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल.
राॅयल चॅलेंजर्स बंगलोर
आयपीएलमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आणि चांगल्या फाॅर्मात असला तरी सध्या वादग्रस्त कारणामुळे चर्चेत असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील राॅयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला बाद फेरी गाठण्याची संधी आहे. सध्या १० सामन्यात ५ विजय आणि ५ पराभवासाठी १० गुण घेत हा संघ पाचव्या स्थानी आहे. उर्वरित चार सामने जिंकल्यास कोणत्याही ‘जर-तर’विना हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. मात्र, एका सामन्यात जरी बंगलोरवर प्रतिस्पर्धी संघ भारी ठरला तर मात्र विराट ॲण्ड कंपनी ‘जर-तर’च्या फेऱ्यात अडकेल.
मुंबई इंडियन्स
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला यंदा प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी अद्यापही असली तरी त्यांच्यासमोरील मार्ग खडतर आहे. सध्या मुंबईचा संघ १० सामन्यांत ५ विजय आणि ५ पराभवानंतर १० गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. उर्वरित सर्व म्हणजे चारही सामने जिंकल्यास मुंबईला पात्रता फेरीचे तिकीट मिळेल. एक सामना गमावल्यास मग अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी चांगली धावगती आणि इतर संघांची कामगिरी हे निकष लागू होतील.
पंजाब किंग्ज
पंजाबने आजघडीला १० सामन्यांत ५ विजय आणि ५ पराभवासह १० गुण घेतले असून हा संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानी आहे. उर्वरित चारही सामने जिंकल्यास हा संघ १८ गुणांसह थेट प्लेऑफसाठी पात्र ठरेल. यापैकी एक सामना गमावला तरी या संघाला इतरांवर अवलंबून राहावे लागेल. चारपैकी दोन सामने गमावले तरी पंजाबला प्लेऑफची संधी असेल. मात्र, अतिशय चांगली धावगती आणि इतर संघांची कामगिरी यावर हे अवलंबून असेल. उर्वरित चारपैकी तीन सामने गमावले तर मात्र या संघाला आयपीएलमधून गाशा गुंडाळावा लागेल.
कोलकाता नाईट रायडर्स
सध्या कोलकाता संघ १० सामन्यांत ४ विजयांसह ८ गुण घेत गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. या संघाला उर्वरित ४ सामन्यांत पंजाबव्यतिरिक्त राजस्थान, चेन्नई आणि लखनौविरुद्ध झुंजायचे आहे. सर्व सामने जिंकले आणि चांगली धावगती राखल्यास हा संघ १६ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, पंजाबविरुद्धची आगामी लढत गमावली तरी या संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचणे कठीण होणार आहे. त्यानंतर संघाला उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील आणि इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. दोन किंवा अधिक पराभव पत्करावे लागल्यास कोलकात्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
हैदराबाद सनरायझर्स
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अब्दुल समदने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून सनरायझर्स हैदराबादला रोमांचक विजय मिळूवन दिला. या विजयानंतर हैदराबाद संघ १० सामन्यांत ४ विजय आणि ८ गुणांसह गुणतालिकेत दिल्लीला तळात ढकलून नवव्या क्रमांकावर आला आहे. हैदराबादला आता लखनौ, गुजरात, बंगलोर आणि मुंबईविरुद्ध खेळायचे आहे. चारही सामने जिंकणे आणि उर्वरित संघांपेक्षा चांगला धावगती हे दिव्य पार पाडले तरच हैदराबाद संघ प्लेऑफमध्ये जाईल. एक जरी सामना गमावला तर या संघाला धावगतीसह इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. दोन किंवा अधिक सामने गमावले तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल.
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सचा संघ या मोसमात सध्या तळाला आहे. १० सामन्यांत ४ विजय आणि ६ पराभव अशा कामगिरीसह या संघाने ८ गुण मिळवले आहेत. असे असले तरी दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीबाहेर झालेला नाही. उर्वरित चार सामने जिंकल्यास आणि इतर संघांच्या तुलनेत धावगती चांगली ठेवल्यास हा संघ प्लेऑफमध्ये खेळताना दिसू शकतो. मात्र, चारपैकी एक सामना गमावला तरी मग मात्र दिल्लीला पूर्णपणे इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. दोन सामने गमावले तर मात्र दिल्लीला कोणत्याही निकालाची वाट न पाहता स्पर्धेबाहेर व्हावे लागेल.
वृत्तसंस्था