गुजरात प्ले ऑफच्या दारात!
#अहमदाबाद
गतविजेत्या गुजरात टायटन्सने आपल्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायन्ट्स संघावर रविवारी (दि. ७) ५६ धावांनी मोठा विजय मिळवला. याबरोबरच गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखत गुजरात प्ले ऑफसाठी पात्र ठरण्यासमीप पोहचला आहे.
शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा या सलामीवीरांची धडाकेबाज अर्धशतके तसेच मोहित शर्माने घेतलेले ४ बळी गुजरातच्या विजयात निर्णायक ठरले. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत २ बाद २२७ धावांचा पाऊस पाडला. शुभमनने ५१ चेंडूंत नाबाद ९४ धावा फटकावताना ७ षटकार आणि २ चौकारांची आतषबाजी केली. ३८ वर्षीय साहानेही लखनौच्या गोलंदाजांना आपल्या बॅटचे पाणी पाजताना ४३ चेंडूंत ४ षटकार आणि १० चौकारांसह ८१ धावांची सुरेख खेळी केली. प्रत्युत्तरात, विजयासाठी २२८ धावांच्या अवघड आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या लखनौला कायले मेयर्स-क्विंटन डीकाॅक जोडीने अपेक्षित प्रारंभ करून दिला. मात्र, या दोघांचा अपवाद वगळता लखनौचे इतर फलंदाज अपयशी ठरले. मोहित शर्माने ४ षटकांत २९ धावांमध्ये ४ बळी घेत गुजरातच्या विजयात मोठे योगदान दिले. लखनौतर्फे यंदा आपली पहिलीच लढत खेळत असलेल्या डीकाॅकने या संघातर्फे सर्वाधिक ७० धावा केल्या. शुभमनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
शुभमन-साहा जोडीने १२.१ षटकांत १४२ धावांची वेगवान सलामी देत गुजरातला मोठ्या धावसंख्येकडे नेले. आवेश खानने साहाला बाद करीत ही जोडी फोडली. त्यानंतर शुभमनने कर्णधार हार्दिक पंड्यासह (१५ चेंडूंत २५, २ षटकार, १ चौकार) दुसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूंत ४२ धावांची भागिदारी केली. अखेरच्या षटकांत डेव्हिड मिलरसह (१२ चेंडूंत नाबाद २१, १ षटकार, २ चौकार) शुभमनने नाबाद ४३ धावा जोडल्या.
प्रत्युत्तरात, डीकाॅक-मेयर्स जोडीने ८.२ षटकांत ८८ धावांची सलामी देत सामना अटीतटीचा होण्याचे संकेत दिले होते. मात्र, हे दोघे बाद होताच लखनौच्या हातून सामना निसटला. डीकाॅकने ४१ चेंडूंत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ७० धावांची शानदार खेळी केली. मेयर्सने ३२ चेंडूंत ४८ धावा करताना २ षटकार आणि ७ चौकार लगावले. गुजराततर्फे नूर अहमद, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक बळी घेत मोहित शर्माला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक :
गुजरात टायटन्स : २० षटकांत २ बाद २२७ (शुभमन गिल नाबाद ९४, वृद्धिमान साहा ८१, हार्दिक पंड्या २५, डेव्हिड मिलर २१, आवेश खान १/३४, मोहसीन खान १/४२) विवि लखनौ सुपर जायन्ट्स : २० षटकांत ७ बाद १७१ (क्विंटन डीकाॅक ७०, कायले मेयर्स ४८, आयूष बदोनी २१, मोहित शर्मा ४/२९, नूर अहमद १/२६, राशिद खान १/३४, मोहम्मद शमी १/३७).
सामनावीर : शुभमन गिल. वृत्तसंस्था