विराटकडे नेतृत्व द्या
#नवी दिल्ली
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) तोंडावर आली असतानाच टीम इंडियातील कर्णधारपदाबाबत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय संघ जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भिडणार आहे. या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना दिसणार आहे. पण रवी शास्त्रींनी रोहितच्या अनुपस्थितीत विराट कोहली मोठ्या सामन्यांमध्ये संघाचाच कर्णधार असावा, असे वक्तव्य केले आहे.
कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही कारणास्तव उपलब्ध नसल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवायला हवे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. रोहित त्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाने गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्याच्या पुढे ढकलण्यात आलेल्या शेवटच्या कसोटीत कोहलीला संघाचे नेतृत्व करण्यास सांगायला हवे होते. एवढ्या मोठ्या सामन्यासाठी रोहित तंदुरुस्त असायला हवा, कारण तो कर्णधार आहे, पण कोणत्याही कारणामुळे तो खेळू शकला नाही, तर भारतीय संघाने त्या दिशेने विचार करायला हवा. रोहित खेळत नसेल तर कोहलीने संघाचे कर्णधारपद भूषवायचे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
पुढे शास्त्री म्हणाले की, जेव्हा रोहितला दुखापत झाली तेव्हा मला वाटले की विराटच कर्णधार असेल. जर मी प्रशिक्षक असतो तर मीही हेच सुचवले असते. मला खात्री आहे की राहुल (द्रविड) नेही असेच केले असते. विराटच्या नेतृत्वाबाबत शास्त्री म्हणाले, 'तो त्याच्या खेळाचा पुरेपूर आनंद घेत आहे. मागच्या वर्षी त्याला ब्रेकची गरज होती, पण आता तो पूर्वीसारखाच ऊर्जा, आनंद आणि उत्साहासह परत आल्याचेही शास्त्री यांनी नमूद केले आहे.
वृत्तसंस्था