धोनीच्या स्वाक्षरीबद्दल बोलताना गावसकर भावूक
#चेन्नई
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी शर्टवर महेंद्रसिंह धोनीची स्वाक्षरी घेण्याचा किस्सा सांगितला. यावेळी गावसकर भावूक झाले होते.
गावसकर यांच्या या संवादाचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ही घटना १४ मे रोजी आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान घडली होती. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर धोनी चेपॉक स्टेडियमवर प्रेक्षकांचे आभार मानत होता. त्यानंतर गावसकर यांनी धोनीचा ऑटोग्राफ आपल्या शर्टवर घेतला.
सामना संपल्यानंतर गावसकर केविन पीटरसनसोबत मैदानावर समालोचन करत होते, त्याला सोडून ते धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गेले होते. धोनीने गावसकर यांच्या शर्टवर माही असे लिहिले. त्यानंतर गावसकर म्हणाले, ‘‘धोनी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर या आयपीएल हंगामातील शेवटचा सामना खेळत होता. सामन्यानंतर सीएसकेच्या कर्णधाराने जर्सी आणि टेनिस बॉलचे वाटप करून प्रेक्षकांचे आभार मानले. धोनी स्टेडियमभोवती फिरत होता आणि मी ही संधी साधली. तो एक अविस्मरणीय क्षण बनवायचे ठरवले, म्हणून मी त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धाव घेतली. माझ्या शर्टवर सही करण्याची विनंती धोनीला केली. त्याने ते मान्य केले. माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता कारण या व्यक्तीने भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे.”
वृत्तसंस्था