दिल्लीच्या सलग पाच पराभवांसाठी गांगुली जबाबदार : रवी शास्त्री
#दिल्ली
यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या एकूण १० संघांत दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी सर्वांत सुमार ठरली आहे. आतापर्यंत झालेल्या पाचही लढतीत या संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यासाठी दिल्ली संघाचा मेंटाॅर असलेला सौरभ गांगुली जबाबदार असल्याचे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
पाच सामन्यांनंतरही विजयाची पाटी कोरी असल्याने गुणतालिकेत दिल्लीचा संघ शून्य गुणांसह तळाला आहे. दिल्लीच्या संघात अनेक प्रतिभावान फलंदाजांचा तसेच गोलंदाजांचा समावेश आहे. मात्र, तरीही या संघाला विजयाचे गणित जुळवता आलेले नाही. दिल्लीला शनिवारी (दि. १५) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने नमवले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीच्या फलंदाजांनी बंगलोरच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पॉवरप्ले दरम्यान झटपट चार बळी गमावल्यानंतर सामन्यात परतण्यात हा संघ अपयशी ठरला.
आयपीएल-१६ मधील सुमार कामगिरीमुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यासह इतर खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. मात्र, या पराभवाचं खापर रवी शास्त्री यांनी सौरव गांगुलीवर फोडलं आहे. ‘‘सौरव गांगुलीला वाटलं असेल ही गोष्ट फार सोपी आहे. पण, असं नाही. या स्पर्धेसाठी तुम्हाला योग्य रणनीती आखावीच लागते. यात दिल्लीचा संघ अपयशी ठरत आहे.’’सौरव गांगुली यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मेंटाॅर आणि ऑपरेशन हेडदेखील आहे.
वीरूने केली दादासाठी बॅटिंग, म्हणे पराभवास पाॅंटिंग जबाबदार
रवी शास्त्री यांनी दिल्लीच्या पराभवासाठी मेंटाॅर आणि ऑपरेशन हेडच्या भूमिकेत असलेल्या साैरभ गांगुलीला जबाबदार धरले असताना वीरेंद्र सेहवागने मात्र आपल्या आवडत्या खेळाडूचा बचाव केला. दिल्लीच्या पराभवासाठी त्याने प्रशिक्षक रिकी पाॅंटिंग यांना जबाबदार ठरवलं आहे. वीरू म्हणाला, ‘‘या वर्षीच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या खराब कामगिरीसाठी कुणाला दोष द्यायचा असेल तर तो प्रशिक्षक रिकी पाँटिंगला द्यावा लागेल. मला वाटतं, जेव्हा एखादा संघ जिंकतो तेव्हा प्रशिक्षकांना श्रेय दिलं जातं, त्यामुळे जेव्हा संघ हरतो तेव्हाही प्रशिक्षकांना जबाबदार धरलं पाहिजे. पाँटिंगने याआधीच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. संघ दरवर्षी प्लेऑफमध्ये पोहोचताना पाहायला मिळालं तेव्हा पाँटिंगने सर्व श्रेय घेतलं. आता संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारीदेखील त्याला घ्यावी लागेल.’’
वृत्तसंस्था