डॉ. शर्वरी इनामदार यांनी जिंकला ‘स्ट्राँग वूमन ऑफ इंडिया’ किताब!
सीविक मिरर ब्यूरो
कोझिकोड (केरळ) येथील व्ही. के. कृष्णमेनन इनडोर स्टेडियम येथे नुकत्याच झालेल्या खुल्या राष्ट्रीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. याबरोबरच त्यांनी ‘स्ट्राँग वूमन ऑफ इंडिया’ हा किताबदेखील आपल्या नावे केला.
डॉ. शर्वरी यांनी ३६७.५ किलो वजन उचलून नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यांनी केरळ, कर्नाटक, हरियाणा, गोवा, मध्य प्रदेश, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड ,आंध्र प्रदेशच्या खेळाडूंपेक्षा सरस कामगिरी करीत हा पराक्रम नोंदवला.
डॉ. शर्वरी या मास्टर गटातील (४० वर्षांपुढील गट) खेळाडू असूनही ओपन-सीनियर गटामध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या भारतातील पहिल्या पाॅवरलिफ्टर ठरल्या आहेत. सर्व वजनी गटातून आयपीएफ- जीएल फॉर्मुल्यानुसार जास्तीत जास्त वजन उचलणाऱ्या खेळाडूला ‘बेस्ट लिफ्टर ऑफ इंडिया’ हा किताब बहाल केला जातो. तो त्यांनी आपल्या नावे केला. त्याचबरोबर ‘स्ट्राँग वूमन ऑफ इंडिया" हा बेस्ट लिफ्टरचा किताबही त्यांनी या स्पर्धेत खेचून आणला.
डॉ. शर्वरी या ‘कोडब्रेकर व्यायाम शाळा’ ही जिम आणि 'आहार आयुर्वेद' हे न्यूट्रिशन क्लीनिक चालवतात. यावर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली आहे.