गोलंदाजांच्या चुकांचा भुर्दंड धोनीला?
#मुंबई
एकदिवसीय आणि कसोटीनंतर आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी करून महेंद्रसिंह धोनीने आपल्या चाहत्यांचे समाधान केले आहे. आयपीएलमध्येही छाप सोडत आपण या प्रकारातही खेळाचा उत्तम आनंद घेऊ शकतो, हे दाखवून दिले आहे, पण तरीही त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. मात्र यामागे त्याची व्यक्तिगत कामगिरी कारणीभूत नसून तो ज्या संघाचा कर्णधार आहे त्या चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजांच्या चुकीची शिक्षा कर्णधार म्हणून त्याला भोगावी लागू शकते.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा चाहता वर्ग मोठा आहे. दरम्यान त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने ही शक्यता वर्तवली आहे, तसेच त्याने चेन्नई संघाच्या खेळाडूंना सावधगिरीचा इशाराही दिला आहे. गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत तुमच्या चुकांचा फटका धोनीला बसू शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.
यंदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची कामगिरी हा धोनीसह दिग्गज खेळाडूंच्या नाराजीचा विषय बनला आहे. त्यात आता वीरेंद्र सेहवागनेही यावर भाष्य केले आहे. संघाचे गोलंदाज सतत वाईड आणि नो बॉल टाकत असल्याने लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यातदेखील चेन्नई सुपरकिंग्जला याचा फटका बसला होता. यावेळी धोनीने त्याच्या संघातील गोलंदाजांना याबाबत सूचना करून आपली कामगिरी सुधारण्याचा सल्ला दिला होता. परंतू, चेन्नईच्या गोलंदाजांनी आरसीबी विरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात ११ अतिरिक्त धावा दिल्या, ज्यात ६ वाइड चेंडूंचा समावेश होता.
वृत्तसंस्था