धोनीलाही दुखापत
#चेन्नई
आयपीएल-१६ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ पराभूत झाला असला तरी या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चाहत्यांची मने जिंकली होती. मात्र, त्याला दुखापत झाल्याचे सामन्यानंतर पुढे आल्याने चेन्नईच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
राजस्थानविरुद्ध धोनीने १७ चेंडूंत तीन षटकार आणि एका चौकारासह ३२ धावा फटकावल्या. धोनीला शेवटच्या चेंडूवर षटकार मारता आला नसला तरी त्याने चाहत्यांची मने नक्कीच जिंकली. या सामन्यात चेन्नईला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामना संपल्यानंतर प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या गुडघ्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली.
फ्लेमिंग म्हणाले, 'धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याचा फिटनेस नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. त्याच्या दुखापतीवर संघाकडून लक्ष ठेवले जात आहे.’’ मात्र धोनी पुढच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत फ्लेमिंग यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे चेन्नई संघाच्या आगामी सामन्यांत धोनी खेळणार किंवा नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
चेन्नई संघाला यंदा दुखापतींनी ग्रासले आहे. धोनीशिवाय दीपक चहर, सिमरजीत, बेन स्टोक्स आणि सिसांडा मगाला हेदेखील दुखापतग्रस्त आहेत. त्याच वेळी, जॅमिसन आणि मुकेश चौधरीदेखील दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. दीपक चहर दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर आहे, तर सिसांडा मगालादेखील किमान एक आठवडा क्रिकेट खेळू शकणार नाही. बेन स्टोक्सही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. वृत्तसंस्था