Chess Rankings 2025 : बुद्धिबळ क्रमवारीत अर्जुन एरिगेसी चौथ्या तर डी गुकेश 'या' स्थानावर कायम....

नववर्षात म्हणजेच बुधवारी जाहीर झालेल्या बुद्धिबळ क्रमवारीत भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी आणि विश्वविजेता डी गुकेश यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान कायम ठेवले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 2 Jan 2025
  • 04:02 pm
Chess Rankings 2025,chess

D. Gukesh (File Pic)

Chess Rankings 2025 : नववर्षात म्हणजेच बुधवारी जाहीर झालेल्या बुद्धिबळ क्रमवारीत भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी आणि विश्वविजेता डी गुकेश यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान कायम ठेवले आहे. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याच्यानंतर 2800 च्या  ईएलओ (ELO) रेटिंगवर पोहोचणारा एरिगेसी हा दुसरा भारतीय आणि एकूण 16 वा खेळाडू ठरला आहे. तो 2801 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून जागतिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा 18 वर्षीय गुकेश 2783 ईएलओ (ELO) च्या रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर, एरिगेसीपेक्षा एक स्थान खाली आहे.

नॉर्वेचा स्टार खेळाडू  मॅग्नस कार्लसन 2831 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे, त्यानंतर फॅबियानो कारुआना (2803) आणि हिकारू नाकामुरा (2802) ही अमेरिकन जोडी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. विश्वनाथन आनंद  हा टॉप 10 मध्ये तिसरा भारतीय आहे जो 2750 च्या ELO रेटिंगसह 10 व्या क्रमांकावर आहे. एरिगेसी, गुकेश आणि आनंद यांच्याव्यतिरिक्त  आणखी सहा भारतीय टॉप 50 मध्ये आहेत. यामध्ये आर प्रज्ञानंद (13वे), अरविंद चितंबरम (23वे), विदित गुजराती (24वे), पी हरिकृष्णा (36वे), निहाल सरीन (41वे), रौनक साधवानी (48वे) स्थानावर आहे.

महिला : कोनेरू हम्पी सहाव्या स्थानावर

महिलांच्या गटात नुकतीच जागतिक जलद बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकणारी भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी 2523 रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे तर चार चिनी खेळाडू अव्वल स्थानावर आहेत.  माजी जगज्जेती होउ यिफान 2633 च्या  ईएलओ (ELO) रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर जू वेनजुन (2561) दुसऱ्या, तान झोंगयी (2561) तिसऱ्या आणि लेई टिंगजी (2552) चौथ्या स्थानावर आहे.

भारताची दिव्या देशमुख 2490 च्या रेटिंगसह 14 व्या स्थानावर तर द्रोणवल्ली हरिका (2489) 16 व्या क्रमांकावर आहे. जागतिक ब्लिट्झ चॅम्पियनशिपच्या महिला गटात कांस्यपदक जिंकणारी आर वैशाली 2476 रेटिंगसह 19व्या स्थानावर आहे. ज्युनियर पुरुष गटात गुकेश आणि आर प्रज्ञानंद अव्वल दोन स्थानांवर आहेत.

 

Share this story

Latest