संग्रहित छायाचित्र
इस्लामाबाद : पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदापासून पाकिस्तान वंचित राहू शकतो. भारताने पाकिस्तानात जाऊन ही स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याबाबतची अधिकृत माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) दिली आहे. पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी आता या मुद्द्यावर पाकिस्तान सरकारकडून सूचना मागितल्या आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने पीसीबीतील सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, जर पाकिस्तानकडून यजमानपद हिरावले गेले तर आम्ही या स्पर्धेत खेळण्यास नकार देऊ शकतो. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय संबंध ताणल्या गेल्यामुळे २००८ पासून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळलेला नाही.
गेल्या वर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. भारताने या स्पर्धेतील आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले. पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दिला आहे. आयसीसीने अधिकृत मेलद्वारे पीसीबीला ही माहिती दिली आहे.
पीसीबीने आधीच स्पष्ट केले आहे की ते चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करणार नाहीत. हायब्रीड मॉडेल म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जावेत आणि उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवण्याच्या प्रस्तावाला पीसीबीने आधीच विरोध केला आहे. ‘द डॉन’च्या वृत्तानुसार, टीम इंडियाच्या सहभागासाठी आयसीसी ही स्पर्धा दुसऱ्या देशात हलवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे. यजमानपद हिसकावून घेतल्यास पाकिस्तान सरकार बोर्डाला या स्पर्धेतून माघार घेण्यास सांगू शकते.
पाकिस्तानचा संघ गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. भारतीय संघाने हा सामना 7 विकेटने जिंकला. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके केली होती. जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. त्याने १९ धावांत २ बळी घेतले.
टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता. तीन कसोटी सामन्यांची ती मालिका भारतीय संघाने १-० ने जिंकली होती. या मालिकेतील २ सामने अनिर्णित राहिले. पाकिस्तानने शेवटचा भारत दौरा २०१२-१३ मध्ये केला होता. त्या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन टी२० सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळली गेली. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली, तर टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.