संग्रहित छायाचित्र....
IND vs ENG ODI Series 2025 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी यापूर्वीच टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
या कारणामुळे दिली जाऊ शकते विश्रांती...
मिडिया रिपोर्टनुसार, वर्कलोड मॅनेजमेंटमुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे त्रिकूट इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होणार नाहीत. तर बुमराह वनडे मालिकेसह टी-20 मालिकेतही सहभागी होणार नाही. मात्र, याबाबत अधिकृत अपडेट्स येणे बाकी आहे.
येत्या 6 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ एकदिवसीय (ODI) मालिकेत खेळताना दिसणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला या स्पर्धेपूर्वी युवा खेळाडूंची चाचपणी करण्याची संधी असेल.
असा असेल इंग्लंडचा भारत दौरा...
भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारीला कोलकाता येथे होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 2 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. यानंतर 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. पहिली वनडे नागपुरात, दुसरी वनडे कटक आणि तिसरी वनडे अहमदाबादमध्ये होणार आहे.
टी-20 मालिका वेळापत्रक...
पहिला ट्वेन्टी-20 सामना : चेन्नई (22 जानेवारी 2025)
दुसरा ट्वेन्टी-20 सामना : कोलकाता (25 जानेवारी 2025)
तिसरा ट्वेन्टी-20 सामना : राजकोट (28 जानेवारी 2025)
चौथा ट्वेन्टी-20 सामना : पुणे (31 जानेवारी 2025)
पाचवा ट्वेन्टी-20 सामना : मुंबई (2 फेब्रुवारी 2025)
एकदिवसीय मालिका वेळापत्रक...
पहिला एकदिवसीय सामना : नागपूर (6 फेब्रुवारी)
दुसरा एकदिवसीय सामना : कटक (9 फेब्रुवारी)
तिसरा एकदिवसीय सामना : अहमदाबाद (12 फेब्रुवारी)
चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार 19 फेब्रुवारीपासून ...
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरूवात 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. ही आयसीसी स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये होणार आहे. भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. त्याचवेळी भारताने पुढे आगेकूच केली तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामनाही दुबईतच होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना बांगलादेशशी 20 फेब्रुवारीला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने संघांची दोन गटात विभागणी केली आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा तर ब गटात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघाचा समावेश आहे.