आयपीएलवर सट्टेबाजीचे सावट
#बंगळुरु
आयपीएलचे १६वे सत्र मध्यावर येत असतानाच या स्पर्धेवर सट्टेबाजीचे सावट आले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (आरसीबी) गोलंदाज मोहम्मद सिराज याला एका बुकीने फोन करून त्याच्या संघाबाबत माहिती विचारली. ही बाब समोर येताच आयपीएलमध्ये खळबळ उडाली.
सिराजने त्याला देण्यात आलेल्या आमिषासंदर्भातील बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. ‘‘एका व्यक्तीने मला फोन करून बंगलोर संघामधील घडामोडींविषयी माहिती विचारली. यासाठी त्याने मला पैशाचे आमिषदेखील दिले,’’असे सिराजने बीसीसीआयला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
बीसीसीआआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने (एसीयू) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ‘‘सिराजला फोन करणारी व्यक्ती हैदराबादमध्ये वाहनचालक आहे. त्याला सट्टेबाजीचे व्यसन आहे. आयपीएल सामन्यावर सट्टेबाजीत भरपूर पैसे गमावल्यानंतर त्याने हा कॉल केल्याचे समोर आले,’’ अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला दिली.
तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सिराजला फोन करणाऱ्याला अटक केली आहे. अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘‘आरोपीने आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीत लाखो रुपये गमावले. आयपीएलमधील प्रत्येक संघासोबत एक एसीयू अधिकारी असतो. खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहतात त्याच हॉटेलमध्ये तो अधिकारी राहत असतो. खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर त्याचे लक्ष असते. हा अधिकारी खेळाडूंना काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती देत असतो. एखाद्या खेळाडूला अज्ञात व्यक्तीने कोणत्याही मार्गाने संपर्क साधल्यास, खेळाडूंनी ताबडतोब उपस्थित एसीयू अधिकाऱ्याला कळवावे, असे स्पष्ट निर्देश खेळाडूंना आहेत. त्यानुसार, सिराजने एसीयू अधिकाऱ्याला याबाबतची माहिती दिल्याने लगेच यावर कारवाई करण्यात आली. एखादा खेळाडू माहिती देऊ शकला नाही, तर त्या खेळाडूवरही कारवाई केली जाते.’’
अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यानंतर एसीयूला तत्काळ माहिती दिल्याने सिराजचे कौतुक होत आहे. यापूर्वी बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनला असाच फोन आला होता. मात्र बीसीसीआय तसेच एसीयूला माहिती न दिल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.
आयपीएलमध्ये सिराजच्या आरसीबीला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. मात्र, सिराजची वैयक्तिक कामगिरी लक्षणीय ठरली आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात प्रति षटक ७च्या सरासरीने ८ गडी बाद केले आहेत. चिन्नास्वामीच्या पाटा खेळपट्टीवर प्रभावी मारा करीत त्याने समीक्षकांची वाहवा मिळाली होती.
वृत्तसंस्था