संग्रहित छायाचित्र
पाकिस्तानच्या क्रिकेट जगतामधून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बाबर आझमने (Babar Azam) वनडे आणि टी20 क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल बाबरने सोशल मिडियावर माहिती दिली. फलंदाजी आणि खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी असा निर्णय घेतला असल्याचं आझमने सांगितलं. त्याचबरोबर एक खेळाडू म्हणून संघाला योगदान देणार असल्याचं तो आहे.
खरं तर पाकिस्तान क्रिकेटची अवस्था बिकट झाली आहे. त्यात बाबर आझम याचा फॉर्म पूर्णपणे गेलेला आहे. त्यात त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी होती. त्यामुळे सगळीकडून बाबरलाच टीकेचं धनी व्हावं लागत होतं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर बाबर आझमने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावर व्हाइट बॉल क्रिकेटचं कर्णधारपद सोपण्यात आलं होतं. पण गेल्या काही दिवसात पाकिस्तान क्रिकेटमध्ये बरंच काही घडत आहे. संघात दोन गट असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. असं असताना बाबर आझमने पुन्हा एकदा वनडे आणि टी20 क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. कर्णधारपद सोडल्याची माहिती बाबर आझमने रात्री सोशल मीडियावर दिली.
"प्रिय चाहत्यांनो, आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे. गेल्या महिन्यात पीसीबी आणि संघ व्यवस्थापनाला मी अधिसूचना दिली होती. त्यानुसार मी पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. पण आता मी पदावरून पायउतार होत आहे. ही माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे. कर्णधारपद भूषवणे हा एक खूपच चांगला अनुभव होता. पण त्यामुळे कामाचा ताणही वाढला.मी आता माझी फलंदाजी आणि खेळावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे. कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. म्हणून मी कर्णधारपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला. आता कर्णधार नाही तर एक खेळाडू म्हणून संघासाठी आपलं योगदान देऊ इच्छित आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद.”