‘अस्मिता’च उठली चेन्नईच्या मुळावर
#चेन्नई
इंडियन प्रीमियर लीगचे १६ वे सत्र रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीन सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत. धोनीची अखेरची स्पर्धा असल्याने क्रिकेटप्रेमींचे लक्ष चेन्नई संघाच्या कामगिरीवर लागून आहे. असे असताना तमिळनाडूच्या एका आमदाराने चेन्नईच्या संघावर बंदी घालण्याची मागणी केल्याने गोंधळ उडाला आहे. चेन्नई नाव असलेल्या संघात चेन्नई तर सोडाच, संपूर्ण तमिळनाडूतील एकाही खेळाडूचा समावेश नाही. यामुळे त्याने तमिळ अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत चेन्नई संघावर बंदीची मागणी लावून धरली.
पट्टली मक्कल काची अर्थात पीएमके या तमिळनाडूतील स्थानिक पक्षाचे आमदार एस. पी. व्यंकटेश्वरन यांनी ही मागणी केली आहे. विधानसभेचे कामकाज सुरू असताना त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज नाव असलेल्या संघात तमिळनाडूचा एकही खेळाडू नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेत या संघावर बंदीची मागणी केली. चेन्नईचे होम ग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना बुधवारी (दि. १२) झाला. मात्र त्यापूर्वीच या संघाच्या नावावरून तमिळनाडूच्या विधानसभेत गदारोळ झाला. व्यंकटेश्वरन यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
चेन्नईच्या संघामध्ये एकही तमिळ खेळाडू नसल्यावर आमदार व्यकटेश्वरन यांनी तीव्र आक्षेप घेतला. तमिळनाडूच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान क्रीडाक्षेत्रासाठीच्या तरतुदीवर भाष्य करताना व्यंकटेश्वरन यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ‘‘आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज हा संघ तमिळनाडू राज्यातील असला तरी त्यात तमिळ खेळाडूंना महत्व दिले जात नाही,’’ असा आरोप त्यांनी केला. सध्या चेन्नई संघात एकही तमिळ खेळाडू नसल्याने त्यांच्या आरोपाला तमिळनाडूत गंभीरपणे घेतले जात आहे.
विधानभवनात तमिळ अस्मितेची भूमिका मांडताना आमदार व्यंकटेश्वरन म्हणाले, ‘‘तमिळनाडूमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे नाव तमिळनाडूची राजधानी चेन्नईच्या नावावर आहे. तरीदेखील या संघात एकही तमिळ खेळाडू नाही. राज्याच्या दृष्टीने ही दुर्दैवाची बाब आहे. मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यावर कारवाई करतील, याची मला खात्री आहे. तमिळनाडूत तमिळ लोकांना महत्त्व दिले नाही तर त्यांना इतरत्र कुठेही महत्व दिले जाणार नाही.’’
पीएमके या पक्षाने तमिळनाडूत २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये व्यंकटेश्वरन यांनी जिंकलेल्या धर्मपुरी मतदारसंघाचाही समावेश आहे वेंकटेश्वरन यांच्या मते, ‘‘सीएसके संघ हा तमिळनाडूमध्ये एक मोठा ब्रँड आहे. माझा त्यावर आक्षेप नाही. पण या संघात राज्यातील खेळाडूंचा समावेश नसणे खटकणारे आहे.’’ व्यंकटेश्वरन यांची भूमिका योग्य असल्याचे मत तमिळनाडूच्या विविध क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर तमिळनाडू सरकार
कोणती पावले उचलते, याकडे तमिळ जनतेचे लक्ष लागून आहे. वृत्तसंस्था