आशिया चषक स्पर्धा यंदा रद्द?
#इस्लामाबाद
येत्या सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात होणारी आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) हवाल्याने पाकिस्तानी माध्यमांनी हा दावा केला आहे.
यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होत असल्याने भारतीय संघ तेथे जाणार नाही. यामुळे पाकिस्तानकडून आगपाखड करण्यात येत आहे. असे असले तरी बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर पाकमधील माध्यमांनी ही स्पर्धाच रद्द होणार असल्याचा दावा केला. आशिया कप रद्द झाल्यावर बीसीसीआयकडून पाच देशांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. यात पाकिस्तान सोडून आशियातील इतर संघ सहभागी होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पीसीबीच्या अधिकाऱ्याने सावध भूमिका घेताना याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
आयसीसीच्या कॅलेंडरमध्ये यंदा होणाऱ्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. हे कॅलेंडर जारी होताच बीसीसीआयने स्पष्ट केले होते की, भारतीय संघ स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही. बीसीसीआयने नव्या ठिकाणी आशिया चषकाचे आयोजन करण्यास सांगितले होते. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे मान्य केले नाही. कारण आशिया चषक पाकिस्तानात झाल्यास बोर्डाची खराब आर्थिक स्थिती सावरण्याची आशा त्यांना आहे.
तथापि, पाकने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर घेण्याचा प्रस्तावही दिला आहे. यानुसार भारताचे सामने दुसऱ्या देशात तर उर्वरित सामने पाकिस्तानात खेळवण्याचा प्रस्ताव होता. भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचल्यास अंतिम सामनाही पाकिस्तानबाहेर खेळवण्याचा प्रस्ताव होता. बीसीसीआयने अद्याप यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलला विरोध केला आहे. यामुळे स्पर्धेचा खर्च वाढून महसुलातील हिस्सेदारी कमी होईल असे त्यांनी म्हटले होते.
बीसीसीआयचे सचिव जय शहा अलीकडेच म्हणाले होते की, आशिया चषकातील भारताचे सामने पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशात खेळवण्याच्या पीसीबीच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. इतर देशांकडूनही त्यांचे फीडबॅक घेतले जात आहेत. त्या फीडबॅकच्या आधारेच पुढचा निर्णय घेतला जाईल.
दोन्ही देशांतील शेवटची मालिका जानेवारी २०१३ मध्ये भारतात झाली होती. पाकिस्तानने या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले होते. यानंतर दोन्ही देश द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत. या १० वर्षांत दोन्ही देशांत सर्व फॉरमॅटमधील केवळ १५ सामनेच होऊ शकले होते. यात ८ एकदिवसीय आणि ७ टी-२० सामने खेळले गेले. यापैकी भारताने ११ आणि पाकिस्तानने ४ सामने जिंकले होते. भारतीय संघ राजकीय कारणांमुळे पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी जात नाही. मात्र पाकिस्तानचा संघ २०१६ मध्ये टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात आला होता.
वृत्तसंस्था