अमित मिश्राने मोडला मलिंगाचा विक्रम!
#लखनौ
अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राच्या फिरकीची जादू आयपीएलमध्ये धमाल करत आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या या दिग्गज फिरकीपटूने राॅयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध सोमवारी (दि. १) मोठी कामगिरी केली. त्याने सुयश प्रभुदेसाईला बाद करत मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. मिश्रा आता १७१ बळींसह आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे.
आरसीबीच्या डावातील १५ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर अमित मिश्राने सुयश प्रभुदेसाईला बाद केले. ४० वर्षीय मिश्राची आयपीएलमधील ही १७१ वी विकेट ठरली. यासोबत अमित मिश्राने लसिथ मलिंगा, पीयूष चावला आणि रवीचंद्रन अश्विन यांना मागे टाकले. या तिघांच्या नावावर प्रत्येकी १७० विकेट आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अमित मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत १८३ बळींसह ड्वेन ब्राव्हो पहिल्या स्थानी असून १७८ गडी बाद करणारा युझवेंद्र चहल दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
फिरकीपटू म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे आता फक्त चहल आहे. मिश्रा दोन वर्षांनंतर आयपीएल खेळत आहे. याआधी तो २०२१ मध्ये खेळला होता. अमित मिश्राने आरसीबीविरुद्ध २ गडी बाद केले. त्याने कर्णधार फाफ डुप्लेसीसचाही समावेश होता.
वृत्तसंस्था