‘ज्यांना पिंपरीचा विकास जमला नाही ते मावळचा विकास काय करणार?’

मावळ मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकारणावर नातेसंबंधांचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. असे असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना त्यांचे नातेवाईक असलेलेच भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी विरोध दर्शविला आहे.

Maval Lok Sabha Constituency

संग्रहित छायाचित्र

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना नातेवाईक, भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचा सवाल

मावळ मतदारसंघ (Maval Lok Sabha) आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकारणावर नातेसंबंधांचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. असे असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना त्यांचे नातेवाईक असलेलेच भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी विरोध दर्शविला आहे. पिंपरी गावातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात वाघेरे वेळोवेळी अपयशी ठरल्यानंतर त्यांना आता मावळचे खासदार होण्याचे डोहाळे लागले आहेत असा टोला संदीप वाघेरे यांनी लगावला आहे.

महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात संदीप वाघेरे यांनी संजोग वाघेरे यांना गेल्या पंधरा-वीस वर्षात पिंपरी गावाचा विकास करता आला नाही हे उदाहरणासह पटवून दिले. मूलभूत सोयी-सुविधा आणि समस्या सोडविण्याचे काम संजोग वाघेरे करू शकले नाही, असे संदीप वाघेरे मेळाव्यात म्हणाले होते. याबाबत संदीप वाघेरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेक धक्कादायक आरोप यावेळी केले . ते म्हणाले, यांना आता खासदार व्हायचे आहे ते कशासाठी? महापालिकेत ज्या पद्धतीने ठेकेदारी करून स्वतःचे घर भरले, त्याच पद्धतीने खासदार होऊन स्वतःचे घर भरायचे आहे का ? असा सवाल संदीप वाघेरे यांनी ‘सीविक मिर“ शी बोलताना उपस्थित केला.

संजोग वाघेरे यांच्या कुटुंबात कायमच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने वेळोवेळी अनेक पद होती. संजोग वाघेरे पाटील यांचे दिवंगत वडील भिकू वाघेरे पाटील हे महापौर होते. त्याचबरोबर संजोग वाघेरे यांनीदेखील महापौरपद भूषविले आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीदेखील स्थायी समिती सदस्या होत्या. एवढी मोठी पदं घरात असतानादेखील पिंपरी गावाला जुन्या पुणे-मुंबई महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वे लाईनवरील उड्डाणपूल संजोग वाघेरे यांना बांधता आला नाही.

ते पुढे म्हणाले, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी या अवघ्या ८-१० वर्षात नव्याने विकसित झालेल्या भागात आज सिमेंटचे रस्ते आहेत. मात्र शहराला ज्या गावाच्या नावामुळे ओळखले जाते, त्या पिंपरी गावातील डांबरी रस्तेदेखील या गावाचे गेली अनेक वर्ष नेतृत्व करणाऱ्या संजोग वाघेरे यांना नीट करता आले नाही. २०१८ मध्ये भाजपच्या माध्यमातून मी नगरसेवक झाल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहे, सिमेंटचे रस्ते, खेळाची मैदानी, स्मशानभूमी, रेल्वे उड्डाणपूल मंजूर करून आणणे अशी अनेक कामे माझे कर्तव्य म्हणून पार पाडली. मात्र गेली पंधरा-वीस वर्षे घरामध्ये सत्तेची पद असणाऱ्या याच संजोग वाघेरेंना महापालिकेमध्ये वेगवेगळी ठेकेदारी करून स्वतःची दुकानदारी करण्यापलीकडे गावाचा विकास करता आलेला नाही. त्यामुळे आता उरल्या सुरल्या शिवसेनेत जाऊन खासदारकी लढवणे हे हास्यास्पद आहे, असा टोला संदीप वाघेरे पाटील यांनी लगावला. नात्यागोत्याचे गावकी-भावकीचे राजकारण आणि सगळे माझे नातेवाईक आहेत हे म्हणणे ठीक आहे. मी देखील नातेवाईक आहे. मात्र सर्वप्रथम मी भाजपचा माजी नगरसेवक आहे. माझ्या पक्षाने दिलेला आदेश आणि महायुतीने दिलेल्या उमेदवाराचे काम करणे हे माझे काम आहे. अन् त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचे झाल्यास माझे नातेवाईक असणाऱ्या संजोग वाघेरेंनी मागील पंधरा वर्षात माझ्या गावाचा काहीच विकास केला नाही. त्यामुळे केवळ नातेवाईक असल्यामुळे त्यांना मतदान अथवा मदत का करायची हा प्रश्न आज माझ्यासारख्याच मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक नातेवाईकांना पडला आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सुरुवातीला नव्हते. भाजप आणि दहा वर्ष मावळ लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने पिंपरी-चिंचवडचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये केला. परिणामी पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झपाट्याने झाला आहे.आज स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराची ओळख जगाच्या पाठीवर झाली आहे. त्यामुळे केवळ ठेकेदारी करून घर भरण्यासाठी खासदार होऊ पाहणाऱ्या संजोग वाघेरे यांच्याऐवजी शहराच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनाच मतदान करावे असे मी माझ्या मावळ मधील सर्व नात्यागोत्याच्या लोकांना भेटून सांगितले आहे, असेही संदीप वाघेरे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest