‘बारामतीत मताला अडीच हजारांचा भाव’; अजित पवारांनी २०० ते ३०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप

बारामती मतदारसंघाकडे देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. मतदारसंघात प्रथमच पवार विरुध्द पवार अशी लढत होत आहे. यामुळे राजकारण चांगलेच तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून धनशक्तीचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे.

अजित पवारांनी २०० ते ३०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप

बारामती मतदारसंघाकडे देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. मतदारसंघात प्रथमच पवार विरुध्द पवार अशी लढत होत आहे. यामुळे राजकारण चांगलेच तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून धनशक्तीचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच बारामती मतदारसंघात एका मतासाठी अडीच हजार रुपये देण्यात येत आहेत. यासाठी जवळपास २०० ते ३०० कोटी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवारांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली. रोहित पवार म्हणाले, राज्यात एका निवडणुकीसाठी २०० ते ३०० कोटी रुपये वापरण्यात येत आहेत. एवढे पैसे त्यांनी राज्यात वापरले असते तर पक्षाचे १४४ उमेदवार निवडून येऊन अजित पवार स्वतः मुख्यमंत्री झाले असते. सहा महिन्यांपासून बहिणीला पाडण्यासाठी पक्षाची सर्व यंत्रणा अजित पवार घेऊन गेले. घरातील उमेदवार उभा करून स्वतःच्या बहिणीला पाडण्याचा ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर संताप व्यक्त केला. तसेच तुम्ही कोणत्या वस्तीत, झोपडपट्टीत राहता त्यानुसार हे पैसे दिले जात आहेत. अजित पवार यांनी बारामतीत सर्व लक्ष्य केंद्रित केल्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बारामती मतदारसंघात आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व बूथच्या संर्पकात आहेत. त्यांना ज्या अडचणी आल्या त्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मतदारसंघात १५५ संवेदनशील बूथ आहेत. आम्हाला आतापर्यंत २५० तक्रारी मिळाल्या आहेत. त्यातील बहुतांश तक्रारी बारामतीच्या आहेत. यापैकी पैसे वाटण्याशी संबंधित १८ तक्रारी आहेत. जनता झुंडशाही, दडपशाही व आर्थिक ताकदीकडे जाणार नसल्याचे सांगत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

खडकवासला मतदारसंघात भाजपला मतदान अधिक होते. परंतु यंदा मतदार बाहेर आले नाहीत. मतदारसंघात अजितदादांचा बिल्ला घालून सरकारी कर्मचारी घरी जाऊन सर्व्हे करतात. त्यामुळे त्यांचा मतदान अहवाल तकलादू आहे. कमळ चिखलात उगवते, ते एक फूल असते. अनेकांना मतदान केंद्रावर कमळ दिसत नसल्याने ते परत जात आहेत. असे लाखभर मतदार खडकवासल्यात असतील. हे विरोधक उमेदवाराचे दुर्दैव असल्याचे रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांनी दैवत सोडले...

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे अजित पवारांचे पूर्वी दैवत होते. परंतु आता त्यांनी दैवत सोडले. मोठ्या कुटुंबापेक्षा छोटे कुटुंब अजित पवारांना प्रिय आहे. अजित पवार म्हणत आहे की, शरद पवारांना यापूर्वीच सोडायला हवे होते. म्हणजेच त्यांचा स्वार्थी विचार असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या १७ वर्षांपूर्वी पासून त्यांना वेगळे होयचे होते.

शरद पवार तर स्वाभिमानी मराठ्यांचे प्रतीक

बारामतीत प्रचाराच्या सभेत शरद पवारांना बोलता आले नाही. अँटिबायोटिक घेतल्यामुळे प्रचार सांगता सभेत त्यांना झोप येत होती. त्यांना डॉक्टरांनी चार ते पाच दिवस आराम करण्यास सांगितले आहे. सततच्या सभा, दौरे यामुळे या वयात त्यांना आराम मिळाला नाही. गेल्या २२ दिवसांत त्यांनी तब्बल ५२ सभा घेतल्या. आताही ते केवळ एका दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा मैदानावर निघाले आहेत. शरद पवार हे स्वाभिमानी मराठी माणसाचे प्रतीक आहेत. मराठी माणूस कधी शांत बसत नाही. असेही रोहित पवारांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest