संग्रहित छायाचित्र
बारामती : शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मात्र शरद पवार जेव्हा जेव्हा निवृत्तीच्या घडामोडी घडल्या तेव्हा तेव्हा ते अधिक सक्रिय झालेले पाहायला मिळाले. शरद पवार म्हणाले, "बारामतीची जबाबदारी पहिली ३० वर्ष माझ्यावर, माझ्यानंतर ३० वर्ष अजित पवारांवर होती. आता पुढच्या ३० वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे." शरद पवारांनी बारामतीची सूत्र युगेंद्र पवारांकडे सोपवण्याचा केला उल्लेख केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तो मागे घेतला. त्यानंतर लगेचच पक्षात फूट पडली व अजित पवार गट सत्ताधारी महायुतीमध्ये सामील झाला. तेव्हाही शरद पवारांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. आता शरद पवारांनी राजकीय निवृत्ती घेण्याचेच थेट संकेत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होऊ लागली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. तर दुसरीकडे निवृत्तीची चर्चा आहे.
तुम्ही प्रत्येक वेळी निवडून देता, पण
मी आत्ता राज्यसभेत आहे. अजून दीड वर्ष टर्म आहे. त्यानंतर पुन्हा राज्यसभेत जायचे की नाही याचाही विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढवणार नाही. कोणतीच निवडणूक लढवणार नाही. किती निवडणुका लढवायच्या? आत्तापर्यंत १४ निवडणुका लढवल्या. आणि तुम्ही असले लोक आहात की एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच देताय. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी आणली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय”, अशा शब्दांत शरद पवारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
याचा अर्थ समाजकारण सोडलेलं नाही. सत्ता नको. पण लोकांची सेवा, लोकांचं काम करतच राहायचं. ज्या भागात दलित, भटके विमुक्त, उपेक्षित या वर्गासाठी जे काही करता येईल, ते करायचं हा माझा स्वत:चा निर्णय आहे. निवडणूक आता आपल्याला नको हे मी ठरवलं आहे. पण तसं असलं, तरी राज्य व्यवस्थित चाललं पाहिजे. त्यासाठी नवी पिढी तयार करायला पाहिजे, असं ते म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांनी बारामतीमध्ये आज युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी गेल्या ५५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सक्रिय असल्याचं नमूद करत त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले. “तुमच्यातले काही लोक त्या वेळी हयात होते, काहींचा जन्म झाला नव्हता. ५५ वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राच्या सगळ्या भागात काम करायला सुरुवात केली. १९६७ साली त्यावेळच्या मतदारांनी मला निवडून दिलं. त्यातले काही मतदार मला अजूनही इथे दिसत आहेत. त्याला आता ५०-५५ वर्ष होऊन गेली. मी सगळ्यांच्या पाठिंब्यानं विधानसभेत गेलो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, संरक्षण खात्याचं काम केलं, शेती खात्याचं काम केलं आणि आज मी राज्यसभेत आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“लोकसभेत एकदा तुमच्या मतांवर निवडून गेलो आणि नंतर ठरवलं की आता लोकसभा नाही. कारण ३०-३५ वर्ष सतत निवडून गेल्यानंतर नवी पिढी तयार करायला पाहिजे. त्यामुळे ३० वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला की आता मी लोकसभेला उभा राहणार नाही. इथलं राजकारण मी बघणार नाही. ही सगळी जबाबदारी अजित पवारांकडे देईन. जवळपास गेली २५-३० वर्ष ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. पहिली ३० वर्ष माझ्यावर, माझ्यानंतर ३० वर्ष अजित पवारांवर. आता पुढच्या ३० वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे. ती करायची असेल तर लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यात लक्ष घालण्याची दृष्टी हवी”, असं म्हणत शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या हाती बारामतीची सूत्रं सोपवत असल्याचं नमूद केलं.