मावळमधून खासदार श्रीरंग बारणेंचा पराभव करणार, ठाकरेंच्या शिलेदाराने रणशिंग फुंकले
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर केली आहे, असा दावा माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केला आहे. तसेच मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल", असा विश्वास व्यक्त करत अनंत गीते यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आज खोपोलीत विधानसभा आणि लोकसभा निहाय बैठक होत आहे. या बैठकीत मावळ लोकसभा निवडणुकीचा आढावा उद्धव ठाकरे घेत आहेत. तसेच कर्जत विधानसभासह इतरही मतदारसंघाची चाचपणी त्यांच्याकडून या बैठकीत केली जाणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आजी-माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करणार आहेत.
सध्या रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे खासदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये शिवसेनेचे तत्कालिन खासदार अनंत गीते यांचा पराभव केला होता. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष फुटले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाच्या दोन्ही बाजूकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे मावळ मतदारसंघात श्रीरंग अप्पा बारणे हे सध्या खासदार आहेत. जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे, मावळ मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे गटाकडून नवा आणि आश्वासक चेहरा दिला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच कर्जत विधानसभेसाठी महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. जे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे येथे देखील आश्वासक चेहरा दिला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना अनंत गिते म्हणाले की, रायगड लोकसभेतून मला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मी रायगड लोकसभा लढवणार आहे. उद्धव ठाकरे घेत असलेली बैठक ही खोपोली येथील रमाधाम वृ्द्धाश्रमासाठी आहे. बैठकीला पक्षाचे नेते, उपनेते, आमदार, मुंबई विभागप्रमुख, रायगडचे जिल्हाप्रमुख, उपस्थित राहणार आहेत. यावेळी इतर विषयांवर चर्चा होईल. कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार उद्धा उद्धव ठाकरे जाहीर करतील, मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.