संग्रहित छायाचित्र
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहे. प्रचारासाठी अवघा एक आठवडा राहिला असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहे. दिल्लीतील अनेक नेते राज्यामध्ये प्रचारासाठी तंबू ठोकून बसले आहेत. तसेच पक्षाकडून जाहीरनामा देखील प्रसिद्ध केले आहेत. यापूर्वी अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा देखील वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावरुन आता भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा मातोश्रीवरुन प्रसिद्ध केला. यावेळी ते म्हणाले की, मुंबई व महाराष्ट्राचे गृहनिर्माण धोरण ठरवण्यात येणार आहे. इतर शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल. कोळीवाडीची ओळख पुसू देणार नाही. कोळीवाड्यांचा क्लस्टरचा जीआर रद्द करू, राज्यातील बेरोजगारी दूर करू, भूमिपुत्रांना नोकरी देऊ, मुलांना मोफत शिक्षण देऊ, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, आदी आश्वासने उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार, आम्ही जनतेची सेवा कशी करू, याचे आश्वासन मी जनतेसमोर ठेवले आहे. जनता…होय…आम्ही जे बोलतो तेच करतो. आम्ही अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत आणि आजही जनतेचा आशीर्वाद मिळाल्यावर आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यांच्या या वचननाम्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
बावनकुळे म्हणाले की, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरते राजकारण केले. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचे हित होते. पण सच्च्या शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबच आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.