संग्रहित छायाचित्र
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राज ठाकरे यांनी डोंबिवलीमध्ये फोडला. यावेळी घेतलेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण ही एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नसल्याचे सांगितले. शिवसेनेचा धनुष्यबाण हा उद्धव यांचाही नाही असे त्यांनी सांगितले. ती प्रॉपर्टी बाळासाहेब ठाकरेंचीच असल्याचे राज यांनी ठणकावले.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांना उत्तर देण्यात आले. यावर दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेबांची प्रॉपर्टी ही त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारावर चालले म्हणून लोक त्यांच्याबरोबर राहिले. बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी सोडले हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे.
आदित्य ठाकरेंवर टीका दीपक केसरकर म्हणाले, ज्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसच्या नेत्याने अपशब्द वापरले होते. त्यावेळी त्या मंत्र्याला बाळासाहेबांनी मुंबईत येऊ दिले नाही मात्र, काँग्रेस नेत्यासोबत युवराज गळाभेट घेतात पण जनता हे सहन करणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंचे नाव न घेता केसरकर यांनी केली.