‘मावळ पॅटर्न’मुळे सुनील शेळके अडचणीत

मावळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्षांकडे थेट राजीनामे देत ‘मावळ पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेतला असून याअंतर्गत अपक्ष उमेदवार बापू भंगडे यांना पाठिंबा दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 6 Nov 2024
  • 12:20 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

फडणवीसांचा आदेश मावळ भाजपने धुडकावला, अजित पवारांच्या आमदारासमोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचे आव्हान

मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे उमेदवार तथा आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे मावळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्षांकडे थेट राजीनामे देत ‘मावळ पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेतला असून याअंतर्गत अपक्ष उमेदवार बापू भंगडे यांना पाठिंबा दिला आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना  शेळके यांचे काम करण्याच्या दिलेल्या आदेशाला धुडकावून लावत आम्ही आमचा ‘मावळ पॅटर्न’ राबविणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट 'मावळ पॅटर्न' वरून प्रचंड संतप्त झाला असून याचे पडसाद राज्यभरात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांचे काम करण्याचा आदेश भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ भाजप पदाधिका-यांना दिले होते. मात्र, मावळातील भाजपच्या पदाधिका-यांनी फडणवीस यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे, तर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यासाठी भाजप पदाधिकारी 'मावळ पॅटर्न' राबविणारच असा ठाम निश्चय केला आहे.

महायुतीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. मावळची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली. पक्षाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

काय आहे मावळ पॅटर्न?

बापू भेगडे यांना मावळ भाजपसह महाविकास आघाडी, मनसेने जाहीर पाठिंबा देत 'मावळ पॅटर्न' उदयास आणला. दुसरीकडे मावळातील भाजपच्या बहुतांशी पदाधिका-यांनी पक्षाच्या पदाचे राजीनामे देत बापू भेगडे यांचेच काम करण्याचे जाहीर करत त्यांचा प्रचारही सुरू केला आहे.  मावळमध्ये शेळके यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने दबावतंत्राचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी चिंचवडमधून अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शेळके यांच्या प्रचारार्थ भाजप पदाधिकारी सक्रिय होण्याचे आणि जाहीर सभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण माघार घेतल्याचे काटे यांनी जाहीर केले. मात्र, त्यानंतरही भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे बापू भेगडे यांचा प्रचार करण्यावर ठाम आहेत.

मावळची लढाई ही प्रवृत्तीच्या विरोधात आहे. चिंचवडला त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. आम्ही बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाम आहोत. आमची लढाई ही स्थानिक पातळीवरील विषयांवर आहे. 
- बाळा भेगडे, माजी आमदार, भाजप

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest