संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी काळात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतानाच त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवी चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांचा आजवरचा इतिहास लक्षात घेता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दिलेले निवृत्तीचे संकेत म्हणजे मतदारांना घातलेली भावनिक साद असून त्याला अन्य कसलाच संदर्भ नाही.
शरद पवारांच्या मर्जीतील पत्रकार म्हणतात त्याप्रमाणे हा त्यांचा गनिमी कावा असू शकतो. प्रत्यक्षात हे भावनिक कार्ड सोडून दुसरे-तिसरे काहीही नाही. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी मागे घेण्याचा दिलेला सल्ला असो वा निवृत्तीचे संकेत देताना अजित पवारांचे केलेले कौतुक असो. पवारांच्या प्रत्येक कृतीमागे केवळ सत्ताकारण असते, हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर दुस-याच दिवशी शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. पक्षाच्या पारंपारिक मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण करणे हा त्याचा महत्त्वाचा उद्देश असू शकतो. शरद पवारांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत त्यांच्यासमोर घरातूनच मोठे आव्हान आहे. पक्षाच्या पारंपारिक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी या वक्तव्याचा शरद पवार यांना फायदा होऊ शकतो.
बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार लढाई होत आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचा विजय झाला. पण, आता विधानसभेत प्रत्यक्ष अजित पवारांशी सामना आहे. त्यामुळे ही लढाई सोपी नाही, याची नक्की जाणीव असलेल्या शरद पवारांनी आता भावनिक साद घालायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी सांगितले की, माझ्या १४ निवडणुका झाल्या आहेत. राज्यसभेचा दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. मी माझे काम करत राहीन. नव्या लोकांना समोर आणले पाहिजे. मी सुरुवातीची ३० वर्षे बारामतीचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर अजित पवारांनी ३० वर्ष इथे विकास केला. आता आगामी ३० वर्षांची मला व्यवस्था करायची आहे. शरद पवार यांनी यापूर्वी लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. त्यानंतर ते आता राज्यसभा निवडणूक लढवणार नाहीत का? संसदीय राजकारणातून निवृत्त होणार का? ही चर्चा आता सुरु झाली आहे. पुढच्या पिढीच्या हातात सूत्रे सोपवण्याचा विषय असेल तर ही गोष्टच अजित पवारांनी नमूद केली होती. घरातील वडिलधाऱ्यांनी कधीतरी निवृत्त होणे गरजेचे असते, हेच अजित पवार म्हणाले होते. मात्र आता निवृत्तीची भाषा बोलत सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.