संग्रहित छायाचित्र
मुंबई : पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरवात झाली आहे. महाविकास आघाडीचे आपणच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा महाविकास आघाडीचे घटक पक्ष आलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार करत आहेत. तशा स्वरूपाचे पत्रक दोन्ही उमेदवारांकडून घरोघरी वाटले जात आहेत.मात्र शेकापतर्फे वाटण्यात येत असलेल्या पत्रकामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख टाळताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट, राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष तसेच इतर सहकारी पक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वेळी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो मात्र वापरण्यात आला आहे.
उबाठा गटाच्या उमेदवार लीना गरड यांच्याकडून वाटण्यात येणाऱ्या पत्रकात महाविकास आघाडीतील पक्षांची नाव आणि त्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये शेकापच्या कोणत्याही नेत्यांना स्थान दिले गेले नाही आहे. दोन्ही उमेदवार हे आपणच अधिकृत असल्याचा दावा करत असून त्यांनी ते पत्रकामध्येही नमूद केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याचा फायदा विरोधी उमेदवारांना होण्याची शक्यता असल्याची भावना महाविकास आघाडीच्या मतदारांकडून व्यक्त केली जात आहे. पनवेल मतदारसंघ हा शेकाप पक्षाला महाविकास आघाडीमध्ये देण्यात येणार होता. शेकापने ठाकरे गटासाठी उरणची जागा न सोडल्याने अलिबाग वगळता पेण,पनवेल मध्ये ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने पनवेल मतदारसंघासाठी भूमिका स्पष्ट करताना स्थानिक पातळीवर शेकापला समर्थन दिले असले तरीही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे. या संभ्रमाचा फायदा भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना होण्याची दाट शक्यता आहे.
शेकापचा गड ते प्रशांत ठाकूरांची हॅट्रिक
पनवेल मतदारसंघ हा वर्षानुवर्षे शेकापचा गड होता. १९६२ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या निवडणूकीपासून ते २००९ पर्यंत सलग ४७ वर्षे या मतदारसंघात शेकाप पक्षाचे आमदार होते. दिनकर पाटील, दत्तात्रय पाटील, विवेक पाटील यांनी या मतदारसंघाचे या काळात नेतृत्व केले. २००९ मध्ये पहिल्यांदा प्रशांत ठाकूर यांनी हा गड उद्धवस्त केला. आणि ते कॉंग्रेसकडून निवडून आले. २०१४, २०१९ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत येथून विजय मिळवला. २०१९ मध्ये त्यांनी शेकापच्या उमेदवाराचा तब्बल ९२ हजारांहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीमध्येही पनवेलमधून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी चांगल्या मतांची आघाडी घेतली होती त्यामुळे प्रशांत ठाकुर यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.