लोकसभेत पाठीत खंजीर खुपसला! शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

नाशिक : शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी एका सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ते या सभेत असे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी (छगन भुजबळ) हातावर लिहिलं की ३ ‘वाजे’ला मतदान करा, पण आपला शिवसैनिक समोरून बोलणारा आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 6 Nov 2024
  • 02:01 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नाशिक : शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी एका सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ते या सभेत असे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी (छगन भुजबळ) हातावर लिहिलं की ३ ‘वाजे’ला मतदान करा, पण आपला शिवसैनिक समोरून बोलणारा आहे. पाठीत खंजीर खुपसणारा नाही’, असे म्हणत हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यावर लोकसभेच्या निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे.

शिंदे गटाच्या नेत्याचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सभा आणि मेळावे पार पडत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या सभांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या नेत्यांवर आणि महायुतीचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र, असं असतानाच महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी एका सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये ऐन विधानसभेची निवडणूक सुरू असतानाच खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेमंत गोडसे काय म्हणाले?

“लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं की, त्यांनी (छगन भुजबळ) आपल्या बरोबर राहिले आणि काय केलं? हातावर लिहिलं ३ ‘वाजे’ला मतदान करा. म्हणजे मला असं वाटतं की आपला शिवसैनिक समोरून बोलणारा आहे. पण पाठीत खंजीर खुपसणारा नाही. त्यामुळे या संदर्भात आपल्या जिल्ह्यातच नाही तर राज्यात अडचणी निर्माण झाल्या. भुजबळ परिवाराने जिल्ह्यात अडचणी केल्याच, पण त्यांच्या त्या एका मतदारसंघामुळे १५ मतदारसंघात अनेक बंडखोर तयार झाले आहेत”, असा हल्लाबोल हेमंत गोडसे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला.

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक होते. पण त्यानंतर छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर नाशिकची उमेदवारी थेट शेवटच्या क्षणी हेमंत गोडसे यांना जाहीर करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे निवडणुकीच्या मैदानात होते. अखेर राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसे यांचा पराभव केला. मात्र, त्या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी हातावर लिहिल की, ३’वाजे’ ला मतदान करा आणि पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केले, असा आरोप आता हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest