संग्रहित छायाचित्र
परळी : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेचा प्रचार रंगात आला असून सभा, बैठका अन् आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळत आहेत. आता निवडणूका म्हटले की, आश्वासनांची खैरात आलीच. आमदारकीच्या रिंगणात उतरलेले अनेक नेते सध्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने, वचने देत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने दिलेले एक आश्वासन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु देतो, असे अजब आश्वासन परळी विधानसभेचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी दिले आहे.
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचारादरम्यान घाटनांदुर येथे अजब आश्वासन दिले आहे. जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु, असे राजेसाहेब देशमुख म्हणाले. विधानसभेच्या प्रचारासाठी आयोजित एका सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर बीडचे खासदार बजरंग सोनवणेही उपस्थित होते. राजेसाहेब देशमुख यांच्या या आश्वासनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून येत असतांना विचारतात नोकरी आहे का? काही कामधंदा आहे का? पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही, तुम्हाला कुठून येणार? एकही उद्योगधंदा उभा केला नाही, त्यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे. पण सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करु, सगळ्या पोरांना कामधंदा देऊ, असे आश्वासन राजेसाहेब देशमुख यांनी दिले आहे. देशमुखांच्या या आश्वासनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, बीडच्या परळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेत पंकजा मुंडेंना धक्का दिल्यानंतर आता विधानसभेतही शरद पवार यांनी मराठा कार्ड खेळले आहे. त्यामुळे परळीमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मग शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का?
शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी?, असा प्रश्न विचारत अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांना थेट इशारा दिला आहे. ते परळी येथे स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. ‘जर मी एवढ्या लहान कुटुंबात, लहान जातीत जन्माला आलो असेल, तर का कुणाला एवढी भीती वाटायला पाहिजे? शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी?’, असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे. लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव केला तसा धनंजय मुंडेंचाही पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली आहे का, परळीत दहशत आहे, असे म्हणून जर कोणी या मातीचा अपमान करत असेल तर धनंजय मुंडे हे कधीही सहन कऱणार नाही. आता तुम्हीच सांगा परळीत माझी दहशत आहे का, सगळ्यांना वाकून बोलून नमस्कार घालून मेलोय अन् आता म्हणतात मी दादागिरी करतो, जर व्यापाऱ्यांच्या व्यवसायात कुणी आडवे येत असेल तर त्याची गाठ माझ्याशी असेल, असा इशाराही धनंजय मुंडेंनी दिला आहे.