डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्र्यांनी रात्र जागवली! हातकणंगलेतील नाराजीसूर घालवण्यासाठी भेटीगाठी घेऊन केली खलबते

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नाराजीसत्र सुरू असल्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री धावपळ करत गाठी-भेटी घेतल्या. शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह महत्त्वाच्या भेटी घेत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

संग्रहित छायाचित्र

हातकणंगलेतील नाराजीसूर घालवण्यासाठी प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, विनय कोरे यांच्या भेटीगाठी घेऊन केली खलबते

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नाराजीसत्र सुरू असल्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री धावपळ करत गाठी-भेटी घेतल्या. शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह महत्त्वाच्या भेटी घेत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विनय कोरे या इचलकरंजी, शिरोळ, पन्हाळ्याच्या आमदारांनी घेतलेल्या भूमिकेने हातकणंगलेची जागा धोक्यात आल्याची चर्चा आहे. शनिवारी रात्रभर शिंदे यांनी यड्रावकर, आवाडे आणि कोरे यांची भेट घेताना रात्र जागवली. या तिघांतील आमदार विनय कोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी भेटीनंतरही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवल्याने महायुतीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला प्रयत्न करावे लागतील असे दिसत आहे.

जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागत आहे. कोल्हापुरात खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. त्यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तुलनेने हातकणंगले मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. धैर्यशील माने यांची उमेदवारी २८ मार्च रोजी जाहीर झाली. त्यांच्या प्रचाराला अपेक्षित गती मिळालेली नाही. अशातच इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, शिरोळचे शिंदेसेनेचे राजेंद्र पाटील यड्रावकर व इचलकरंजीतील ताराराणी आघाडीचे प्रकाश आवाडे यांनी डावपेच आखले असून त्याला भाजपच्या नेतृत्वाचे छुपे पाठबळ असल्याची चर्चा आहे. या घडामोडींची दखल घेत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणीवपूर्वक कोल्हापूरकडे वाट वाकडी केली. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरात आमदार आवाडे, आमदार पाटील यड्रावकर आणि आमदार कोरे यांच्याशी चर्चा केली. आवाडे यांनी या भेटीनंतरही निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. कोरे, यड्रावकर यांची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले जाते. हातकणंगले मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल बऱ्यापैकी कामाला आल्याचा दावा केला जात आहे. शिंदे यांना खासदार धैर्यशील माने यांची परिस्थिती सुधारावी यासाठी रात्र जागवत गाठीभेटीवर भर द्यावा लागला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन मविआचे उमेदवार सत्यजित पाटील यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरल्याची चर्चा आहे. आवाडे यांनीही यड्रावकर- कोरे या आमदारांना अशीच गळ घातली आहे. या घटनांचे गांभीर्य उमजून मुख्यमंत्री शिंदे यांनी धैर्यशील माने यांच्या समवेत पहाटे जयसिंगपूर गाठून आपल्या गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. धैर्यशील माने यांच्या उमेदवारीमुळे नाराज होऊन राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांचे भाऊ संजय पाटील यड्रावकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालवले होते. तेही या भेटीवेळी उपस्थित होते. शिरोळमधील गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, कुरुंवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन कामाला लागण्याची ग्वाही दिली आहे. माने यांच्या एका प्रचारसभेला लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले शिरोळ तालुक्यातील भाजपचे नेते संजय पाटील तसेच मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी हजेरी लावली होती.

पन्हाळ्यात समेट

जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांची भूमिका या मतदारसंघात निर्णायक आहे. पन्हाळा – शाहूवाडी मतदारसंघातील माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना ठाकरेसेनेची उमेदवारी मिळाली आहे. सरुडकर यांना रोखण्यात कोरे यांची ताकद महत्त्वाची ठरणार आहे. त्यांचे राजकीय वजन लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी विनय कोरे यांची वारणानगर येथे मध्यरात्री भेट घेऊन रात्रभोजन केले. ही डिनर डिप्लोमसी पथ्यावर पडेल अशी अपेक्षा आहे. एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने कृष्णा- वारणा काठ प्रचारासाठी प्रवाहित होत असून तो नाराजीनाट्याने पेचात सापडलेल्या धैर्यशील माने यांच्यासाठी दिलासा ठरत आहे. कोण सोबत कोण विरोधात हे उमेदवारी अर्ज भरतानाच दिसून येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story