मांड पक्की! सलग दोनदा लोकसभा गाठलेल्या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी कोकणात ठाकरे सेनेला रोखले
रायगड मतदारसंघ हा कोणत्या लाटेच्या आहारी जात नाही. त्याऐवजी हा मतदारसंघ आपल्या मनाचा कौल देत असल्याचे पाहायला मिळते. १९८४ मध्ये इंदिरा गांधी हत्येनंतरच्या निवडणुकीत देशभर काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची लाट होती. रायगडमध्ये लाटेच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे दि. बा. पाटील संसदेत पोहोचले होते. २०१४ मध्ये मोदीलाट देशभरात असतानाही युतीच्या अनंत गीतेंना सुनील तटकरेंनी शेवटच्या फेरीपर्यंत टक्कर दिली होती. अवघ्या दोन हजाराने तटकरेंना पराभव स्वीकारावा लागला होता. त्योळी सुनील तटकरे यांच्याच नावाचे आणखी काही उमेदवार उभे असल्याचा फटका त्यांना बसला होता. २०१९ मध्ये पुलवामा आणि मोदीलाट असताना अनंत गीतेंचा सुनील तटकरेंनी पराभव केला. लोकसभेला गीते आणि तटकरेंच्या भोवती राजकारण फिरताना दिसून येते. यापूर्वी अनंत गीते हे १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा चार वेळी खासदार बनले. २०१९ आणि २०२४ मध्ये तटकरेंनी गीतेंना पराभूत केले. सलग दोन विजयानंतर तटकरेंनी मतदारसंघावर आणि जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली मांड ठोकल्याचे दिसते. (Sunil Tatkare)
कधीकाळी शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य असलेला पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड मतदारसंघावर सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे वर्चस्व आहे. १९५२ ते २००४ या काळातील कुलाबा मतदारसंघातून आठ वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यातील चार वेळा काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले निवडून आले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निष्ठावान अंतुले एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री होते. केंद्रातही त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते. काँग्रेस पाठोपाठ चार वेळा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार संसदेवर निवडून गेले. २००९ आणि २०१४ ला शिवसेनेचे अनंत गीते लोकसभेवर निवडून गेले होते. या काळात शेतकरी कामगार पक्षाची जागा शिवसेनेने घेतली असून अजूनही पक्षाची मोठी ताकद असल्याचे दिसते. २००९ मध्ये गीते जेव्हा पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले तेव्हा त्यांच्याविरोधात अंतुले होते. त्यावेळी गीते यांना ४ लाख १३ हजार तर अंतुलेंना २ लाख ६७ हजार मते पडली होती. त्यावेळी गीतेंचे मताधिक्य दीड लाखांच्या घरात होते. काही काळ गीते केंद्रात मंत्रीही होते. २०१४ मध्ये मात्र ते निवडून आले तेही २ हजारांच्या निसटत्या फरकाने. त्यावेळी गीतेंना ३ लाख ९६ हजार तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना ३ लाख ९४ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत निसटत्या पराभवाचे विजयात रूपांतर करताना ३१ हजारांची आघाडी मिळवली. त्यावेळी तटकरेंना ४ लाख ८६ हजार, गीतेंना ४ लाख ५५ हजार तर वंचितच्या उमेदवाराला २३ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. २०२४ मध्ये चित्र तटकरेंना अधिक अनुकूल झाले आणि ते ८२ हजारांच्या फरकाने विजयी झाले. तटकरेंना ५ लाख ८ हजार , गीतेंना ४ लाख २५ हजार आणि नोटाला २७ हजार मते पडली. एवढेच नव्हे तर अनंत गिते नावाचे आणखी दोन उमेदवार मैदानात उतरवले होते. त्यांनी साडे पाच हजार मते खाल्ली. ठाकरे सेनेला अपशकून करण्यासाठी वंचितने उभे केलेल्या उमेदवराने २० हजारांच्या आसपास तर ‘नोटा’ ने २७ हजारांच्या आसपास मते खाल्ली.
सध्याच्या रायगड मतदारसंघातील विधानसभेतील राजकीय बलाबल पाहिले तर सहापैकी केवळ गुहागरचा अपवाद केला तर बाकीच्या मतदारसंघातील पाच आमदार तटकरेंना साथ देणारे होते. गुहागरमधील ठाकरे सेनेचे भास्कर जाधव सोडले तर गीतेंना एकाकी लढत द्यावी लागली होती. पेणमधील रवीशेठ पाटील (भाजप), श्रीवर्धनमधील राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, अलिबागमध्ये महेंद्र दळवी, महाडमधील भरत गोगावले, दापोलीतील योगेश कदम (तिघेही शिंदे शिवसेना) यांनी तटकरेंच्या बाजूने जोर लावला होता. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे सेनेची कमकुवत झाली ताकद, २००९ पासून सतत दिला जाणारा एकच उमेदवार, तटकरेंनी मतदारसंघात जुळवलेली राजकीय समीकरणे यामुळे साऱ्या राज्यात अन्यत्र मार खाताना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ही जागा राखता आली. अर्थात हे यश राष्ट्रवादीचे नाही तर वैयक्तिक तटकरेंचे आहे ही बाब येथे लक्षात ठेवली पाहिजे.
राजकीय गणिते जमवली
२०२४ च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना विरोध नव्हता असे नाही. मात्र, काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या तटकरेंनी राजकीय गणिते जमवून आणली. अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात शेकापची मोठी ताकद आहे. ही मते पेणचे धैर्यशील पाटलांच्या रूपाने तटकरेंनी आपल्या बाजूने वळवली. पेणमधून दोनदा शेकापचे आमदार असलेले धैर्यशील सध्या भाजपमध्ये आहेत. भाजपकडून तेच खासदारकीसाठी इच्छुक होते. महाडचे भरत गोगावले, अलिबागचे महेंद्र दळवी, दापोलीचे योगेश कदम यांनी ‘मविआ’ सत्तेवर असताना तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्या विरोधाचे पाठिंब्यात रूपांतर करण्यात तटकरेंना आलेले यश ही त्यांची मोठी कामगिरी होती. या मतदारसंघात कुणबी मतदार लक्षणीय असून अनंत गीते आणि तटकरे यांच्या मागे हा समाज विभागला गेला आहे. मुस्लीम मतदारांनीही तटकरेंना चांगली साथ दिली.
मंत्रिपदासाठी स्पर्धा
कधीकाळी अंतुलेंचे शिष्यत्व तटकरेंनी जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली मांड ठोकली आहे. केंद्रीय मंत्रिपदावर दावा ठोकणाऱ्या तटकरेंसमोर राज्यसभेच्या सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचा समावेश झाला नाही त्यामागे तटकरे आणि पटेल यांच्यातील स्पर्धा हे महत्वाचे कारण असल्याचे मानले जाते. १९९५ ला काँग्रेसकडून आमदार झालेले तटकरे २००४ पासून २०१४ पर्यंत राज्यात मंत्री होते. विशेष म्हणजे सुरुवातीपासून अजितदादांशी एकनिष्ठ असलेले तटकरे जल ऊर्जामंत्री होती. जलसंधारण मंत्रालयातील भ्रष्टाचारावरून अजित पवारांवर मोठे आरोप झाले होते. विशेष म्हणजे २०१४ च्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाच्या सहाव्या मजल्यावर मोठी आग लागली होती. त्यात बरीच शासकीय कागदपत्रे जळाली होती. चर्चा अशी आहे की, ही कागदपत्रे जल मंत्रालयाशी संबंधित होती. त्यानंतर ना या आगीची चौकशी झाली, ना त्या आगीत कोणत्या कागदपत्रांची राख झाली त्याचा तपशील बाहेर आला. तटकरे यांच्यावर अनेक आरोप झाले असून त्यातील मालमत्ता प्रकरणी ईडी कडून चौकशी सुरू होती.