Solapur: तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या गोटात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भेटी घेणे सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 01:39 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अनिल सावंत पंढरपूर-मंगळवेढामध्ये तुतारी फुंकणार?

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भेटी घेणे सुरू आहे. अशातच महायुतीशी संबंध चांगले असलेल्या नेत्यांचे संबंधित काहीजण यावेळी शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याचे दिसून आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेमधून तुतारी फुंकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

धैर्यशील मोहिते पाटलांनी याआधी पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छुक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती. यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतही उपस्थित होते. त्यानंतर अनिल सावंत रविवारी (२० ऑक्टोबर) पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अनिल सावंत इच्छुक आहेत. मात्र, ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.

उमेदवारीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी आधी पुण्यात थेट शरद पवारांची भेट घेतली.  पंढरपूर मंगळवेढा परिसरातील भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याची शक्यतादेखील या निमित्ताने वर्तवली जात आहे.

कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार?

पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. तर दुसरीकडे भाजपचे दुसरे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. ते देखील इच्छुक उमेदवार असून त्यांनी निवडणुकीसाठीची चाचपणी सुरू केली आहे. तर प्रशांत परिचारक यांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे. तर बीआरएस पक्षाचे भगीरथ भालके यांनी देखील पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे आपली पावले वळवली आहेत.भाजपचे तिकीट जवळपास समाधान आवताडे यांना मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांकडे आली तरी उमेदवार कोण असेल हे निश्चित झालेले नाही. कारण महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके, प्रशांत परिचारक, अनिल सावंत यांचेही मोठे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कोणाच्या हाती तुतारी येते आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest