सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी लवकरच नवा चेहरा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन शिवसेनेच्या 'उबाठा' गटात प्रवेश केला.त्यामुळे राष्ट्रवादीच्या रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 01:36 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लतिफ तांबोळी, डॉ. बसवराज बगले, दिलीप सिध्दे यांच्या नावांची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन शिवसेनेच्या 'उबाठा' गटात प्रवेश केला.त्यामुळे राष्ट्रवादीच्या रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासाठी पक्ष नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाली असून लिंगायत किंवा मुस्लीम समाजाला यंदा संधी दिली जाण्याची चर्चा आहे.

मागील विधानसभा निवडणुकीतही माजी आमदार दीपक साळुंखे यांनी अचानक राष्ट्रवादीचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला होता.सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना साळुंखे यांनी साथ दिली होती.आणि निवडणुकीनंतर पुन्हा ते राष्ट्रवादीत दाखल झाले होते. मात्र राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी बळीराम साठे यांची वर्णी लागली होती.  कालांतराने अजित पवार यांनी आपल्या गटाच्या आमदारांसह वेगळी भूमिका घेऊन सताधारी महायुती सरकारमध्ये सहभागी झाले.त्यामुळे पुन्हा अजितदादांसोबत पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून दीपक साळुंखे यांनाच संधी मिळाली होती. त्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत नाराज झाले होते.

राष्ट्रवादी पक्ष दोन गटात विभागली गेली त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर दीपक साळुंखे यांना काही तालुक्यात पदाधिकारी नेमताना तारेवरची कसरत करावी लागली होती.शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यात अजित पवार गटाला कार्यकर्ते मिळाले नाहीत. दरम्यान मोहोळ आणि उत्तर सोलापूर या दोन्ही तालुक्यांतील उमेश पाटील गटाला सामावून घेण्यात आले नव्हते. माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील पक्षाची स्थिती सुधारण्यास साळुंखे यांना फारसे यश आले नाही. अशा स्थितीत अचानकच साळुंखे हे दुसऱ्यांदा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीची अवस्था 'बडा घर पोकळ वासा' अशी झाली आहे.या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला जिल्हाध्यक्ष नेमताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.पक्षात सक्रिय असलेल्या आणि जिल्हा अध्यक्षपदाला न्याय देण्याची क्षमता असलेल्या कार्यक्षम नेतृत्वाला संधी न दिल्यास सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दिशाहीन व्हावे लागेल अशी स्थिती आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्हाध्यक्षपदावर पंढरपूरचे यशवंत भाऊ पाटील,मोहोळचे मनोहर डोंगरे,उत्तर सोलापूरचे बळीराम साठे आणि सांगोल्याचे दीपक साळुंखे या मराठा नेत्यांची वर्णी लागली आहे. मंगळवेढ्याचे लतीफ तांबोळी,दक्षिण सोलापूरचे डाॅ.बसवराज बगले, अक्कलकोटचे दिलीप सिध्दे,माढ्याचे कैलास तोडकरी ही निष्ठावंत नेतेमंडळी पक्षात पूर्ण वेळ काम करत आहेत.अन्य समाजाच्या या नेतृत्वाला संघटनेत संधी दिल्यास नव्या उमेदीने पक्ष बांधणीसाठी ते योगदान देऊ शकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागणी झाल्यानंतरही विशिष्ट समाजाचेच वर्चस्व राष्ट्रवादीत राहिल्याने अन्य समाजाचे कार्यकर्ते पक्षापासून दुरावत चालले आहेत.ही गळती रोखण्यासाठी इतर बहुजन समाजातील नेत्याला सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी संधी देण्याची भूमिका काही ज्येष्ठ नेत्यांची आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.पक्षासाठी वेळ देऊ शकणारा आणि जिल्ह्यातील सर्वांशी समन्वय ठेऊन काम करणार्‍यांवर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याची भूमिका काही नेत्यांनी हायकमांडकडे मांडली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदावर नव्या चेहऱ्याची वर्णी लागेल, असे प्रदेश पातळीवरील एका नेत्याने सांगितले.

बहुजन समाजाला मिळणार संधी
मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात अजित पवार गटाकडे आकर्षित होत आहे.राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काम करणार्‍या लतिफ तांबोळी यांना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याने यांनी प्रदेश कार्यालयात पक्षाच्या कार्याला वाहून घेतले आहे.त्यांचीही जिल्हाध्यक्ष पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. मनोहर डोंगरे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदावर सलग दोन टर्म कार्य करून डाॅ.बसवराज बगले यांनी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवली होती आणि जिल्हा स्तरावरही त्यांनी राष्ट्रवादीची संघटनात्मक चळवळ व्यापक केली होती. लिंगायत समाजाचे एक अभ्यासू नेते म्हणून डाॅ.बगले हे राष्ट्रवादीत सक्रिय आहेत.सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांच्या नावाचे चांगले वलय आहे. त्यांना जिल्हाध्यक्षपदावर संधी दिल्यास ते पक्षाला जिल्ह्यात गतिमान करतील अशीही चर्चा आहे. अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान तालुका अध्यक्ष दिलीप सिध्दे हे सुध्दा पक्षसंघटना वाढण्यासाठी काम करू शकतील असा सूर आहे.एकूणच निष्ठा आणि संघटन कौशल्याचा विचार झाल्यास तांबोळी डाॅ.बगले अथवा सिध्दे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest