मुंबई आणि विदर्भातील जागांवर उबाठा, काँग्रेसमध्ये रस्सीखेच, काही जागांवर शरद पवारांचाही डोळा, चर्चा करूनही निघेना तोडगा

मुंबई/ नागपूर : महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सध्या पुढे सरकताना दिसत नाही. काही जागांवर ही चर्चा अडली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट विदर्भातील आणि मुंबईतल्या काही जागांवर अडून बसले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 06:27 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई/ नागपूर : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागा वाटपाची चर्चा सध्या पुढे सरकताना दिसत नाही. काही जागांवर ही चर्चा अडली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) विदर्भातील आणि मुंबईतल्या काही जागांवर अडून बसले आहेत. तर काही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटालाही हव्या आहेत. त्यामुळे जागा वाटपात तिढा निर्माण झाला आहे. ऐवढेच नाही तर आघाडीत बिघाडी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्या जागा कोणत्या आणि त्या जागांसाठी रस्सीखेच का सुरू आहे याची कारणे आता समोर आली आहेत.  

मविआमध्ये जागा वाटपात कळीचा मुद्दा ठरतोय तो विदर्भातल्या जागांचा. विदर्भातल्या काही जागांवर काँग्रेसबरोबर शिवसेनेनेही दावा केला आहे. त्यात नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या गिरीश पांडव यांच्यासाठी हवा आहे. मात्र हा मतदारसंघ सोडण्यास शिवसेना ठाकरे गट तयार नाही. दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केल्याने तिढा निर्माण झाला आहे. त्याप्रमाणेच यवतमाळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. मात्र तो  राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे. अकोला पश्चिम मतदारसंघावरही शिवसेनेने दावा केला आहे. मात्र काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. शिवसेनेच्या राजेश मिश्रा यांना इथून निवडणूक लढायची आहे. विदर्भातील आणखी एक जागेवरून वाद सुरू आहे. ती म्हणजे कारंजा विधानसभा मतदारसंघ. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली आहे. इथून प्रणित मोरे पाटील हे मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. तर जळगाव जामोदवर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीने दावा केला आहे. शिवाय दिग्रसचाही वाद सुटलेला नाही. ही जागा काँग्रेसला हवी आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या मुलाला हा मतदारसंघ हवा आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने पवन जैस्वाल यांना मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघाबाबतही वाद आहेच. या मतदारसंघातून काँग्रेसचे अमर काळे निवडणूक लढत होते. मात्र त्यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शिवाय त्यांना लोकसभेची निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. आता काँग्रेसचा या जागेवरली दावा कायम आहे. तर राष्ट्रवादीने ही जागा आपल्याला मिळावी, असा आग्रह धरला आहे. अमर काळे यांची पत्नी येथून उमेदवार असेल असे सांगितले जात आहे. पण काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. काळे यांत्या पत्नीला उमेदवारी देवू असे काँग्रेसने सांगितले आहे.

मुंबईतही सुंदोपसुंदी
कुलाबा मतदारसंघ हा काँग्रेसचा (Congress) राहीला आहे. मात्र ही जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह आदित्य ठाकरेंचा आहे. कुलाबाप्रमाणेच भायखळा मतदारसंघावर ही उबाठा गटाने दावा केला आहे. तर काँग्रेसला माजी आमदार मधु चव्हाण यांच्यासाठी ही जागा हवी आहे. तर सेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव चर्चेत आहे. तिसरा मतदारसंघ हा वर्सोवा विधानसभा मतदारसंघ आहे. येथे सध्या भाजपकडून भारती लव्हेकर आमदार आहेत. माजी मंत्री सुरेश शेट्टी काँग्रेसकडून या मतदारसंघात इच्छुक आहेत. तर ठाकरे गटाकडून राजु पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. विदर्भ आणि मुंबईतल्या जागांप्रमाणेच  पारनेर, शिर्डी, दर्यापूर या मतदारसंघाबाबतही तोडगा निघालेला नाही. या सर्व जागांवरून महाविकास आघाडीत खटके उडत आहेत. तुटेपर्यंच ताणू नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तर काँग्रेसच्या हायकमांडनेही सबुरीने घ्या, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest