बंडखोरी टाळण्याच्या नादात 'पार्टी विथ डिफरन्स' भाजपाकडून घराणेशाहीला रेड कार्पेट

स्वच्छ चारित्र्य आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची आस ही कधीकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची ओळख समजली जात होती. पार्टी विथ डिफरन्स असे बिरुद मिरवणाऱ्या भाजपने नंतरच्या काळात विचारधारा, नैतिक मूल्ये यांच्यापासून फारकत घेतली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

स्वच्छ चारित्र्य आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची आस ही कधीकाळी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकर्त्याची ओळख समजली जात होती. पार्टी विथ डिफरन्स (Party With Difference) असे बिरुद मिरवणाऱ्या भाजपने नंतरच्या काळात विचारधारा, नैतिक मूल्ये यांच्यापासून फारकत घेतली. सत्तेसाठी सर्वकाही अशी काँग्रेससारखीच भूमिका घेत  हा पक्ष वाढीस लागला. महाराष्ट्र विधानसभेसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करतानाही भाजपने हेच धोरण अंगिकारल्याचे स्पष्ट झाले आहे. बंडखोरी टाळण्यासाठी विद्यमान आमदारांनाच तिकिटे देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपची ९९ उमेदवारांची यादी रविवारी (२० ऑक्टोबर) जाहीर झाली. या यादीत बहुतेक विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. काही नव्या चेहऱ्यांनाही तिकीट देण्यात आले आहे.  हरियाणातील सामाजिक अभिसरण लक्षात घेता महाराष्ट्रातही भाजपकडून अशी काही रणनीती अमलात आणली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र पहिल्या यादीतील उमेदवारांच्या नावावरून तरी तसे करण्याचे धाडस पक्षाने दाखवले नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने यंदा तिकीट दिले आहे. मात्र, काँग्रेसला घराणेशाहीवरून नावे ठेवणाऱ्या भाजपने महाराष्ट्र विधानसभेत मात्र घराणेशाहीला रेड कार्पेट अंथरल्याचे दिसत आहे. पक्षातील नेत्यांची मुले, मुली आणि पत्नीलाही पक्षाने तिकीट दिले आहे. आमदार, खासदार आणि मंत्री असलेल्या नेत्यांच्या कुटुंबातच आणखी एक उमेदवारी दिल्याचे दिसून आले आहे. ज्यांच्या घरात वर्षानुवर्षे सत्ता पाणी भरत आहे, घराण्यातील प्रत्येकाने कोणत्या तरी स्तरावर सत्तेची उब अनुभवलेली आहे अशाच घरात पुन्हा तिकीट देऊन आपण काँग्रेसपेक्षा वेगळे नसल्याचेही भाजपनेही सुचवले आहे.  

सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे भवितव्य अधांतरी
भाजपने पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण हे भाजपचे राज्यसभेतील उमदेवार आहेत. तर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार आशिष शेलार यांचे बंधू, माजी नगरसेवक विनोद शेलार यांना तिकीट दिले आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते आणि गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे, पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांचे तिकीट कापून त्यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबात अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वेगळी ओळख सांगायची अन् घराणेशाहीचा पुरस्कार करायचा, असा पवित्रा घेणाऱ्या भाजपमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे भवितव्य अधांतरीच राहिले आहे.  

केवळ १० नवे चेहरे
पक्षाने १० नवे चेहरे दिले आहेत. तेही सत्ता उपभोगलेल्या घराण्यातील आहेत. त्यात प्रतिभा पाचपुते, विनोद शेलार, राजेश बकाने, श्रीजया चव्हाण, शंकर जगताप, विनोद अग्रवाल, अनुराधा चव्हाण, सुलभा गायकवाड, राहुल आवाडे आणि अमोल जावळे आदी नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे, तर गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातून कुणालाच उमेदवारी देण्यात आलेली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest