मतसंग्राम २०२४ : तिकीट वाटपावरून अजित पवार गटाचा गोंधळ

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुतीतील मोठा पक्ष भारतीय जनता पक्षाने रविवारी (दि. २०) ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर इतर पक्षांच्या उमेदवारांच्या यादीकडे लक्ष लागून आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एबी फॉर्म दिल्याचे नव्हे तर तयारीला लागण्याचे दिले आदेश, शरद पवार गटाच्या ३२ जणांच्या संभाव्य यादीबाबतही चर्चा

विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) बिगुल वाजले आहे. महायुतीतील मोठा पक्ष भारतीय जनता पक्षाने रविवारी (दि. २०) ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर इतर पक्षांच्या उमेदवारांच्या यादीकडे लक्ष लागून आहे. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सोमवारी (दि. २१) उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, ‘‘पक्षाने कोणत्याही प्रकारचा एबी फॉर्म दिलेला नसून कागदपत्रांची जुळवाजुळव करून निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही,’’ असे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना स्पष्ट केले.

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसची ३२ जणांची संभाव्य यादी समोर आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. तर दुसरीकडे अजित पवार गटाने एबी फॉर्म वाटप केल्याची बातमी वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली. त्यामुळे संभाव्य उमेदवारांना संपर्क साधला असता चेतन तुपे यांनी एबी फॉर्म दिलेच नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सोमवारी सकाळी अजित पवारांच्या (Ajit Pawar) मुंबईतील देवगिरी बंगल्यावर इच्छुक उमेदवारांनी भेट घेतली.  यात संजय बनसोडे, राजेश विटेकर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांना उमदेवारीचा फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत. तसेच अर्ज भरताना काय काळजी घ्यावी, एवढेच सांगण्यात आले. परंतु अधिकृत एबी फॉर्म दिलेच नाहीत. असे तुपे यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवारांच्या हस्ते यादी जाहीर करण्यापूर्वीच उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याचे वृत्त खरे नसल्याचा पुनरुच्चार तुपे यांनी केला.

पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून (Vadgaon Sheri Assembly Constituency) विद्यमान आमदार सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे, जिल्ह्यातील आंबेगावमधून मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरमधून अतुल बेनके आणि इंदापूरमधून दत्तात्रय भरणे आदींची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.  सोमवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी या नेत्यांनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर एबी फॉर्म दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, अद्याप उमेदवारच निश्चित नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधुक कायम आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे  विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा केला आहे. परंतु जोपर्यंत एबी फॉर्म हातात मिळत किंवा जोवर उमेदवारी अर्ज मान्य केला जात नाही, तोवर ते गॅसवर असणार आहेत.  

अजित पवार गटाचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.  निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आणि आता जागावाटपाची शक्यता पाहता अनेक इच्छुकांनी पक्ष बदलले आहेत. अनेक नेते अजित पवारांची बाजू सोडून इतर पक्षांत प्रवेश करत असतानाच उद्धव ठाकरे शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला.  या पक्षप्रवेशानंतर ज्ञानेश्वर कटके हे शिरूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असे मानले जात आहे.  त्यांचा सामना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याशी होणार आहे.

अजित पवारांनी शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच फोडल्याने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघातील निवडणूक थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest