पडद्याआडून ! शिंदेशाहीची सध्या आहे हवा!

आपल्या घरचा ठाण्याचा गड कायम राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यश मिळवले असल्याने सध्या येथे शिंदे शिवशाहीची हवा कायम आहे, असे म्हणता येईल. शिंदे यांच्या दृष्टीने ठाणे आणि कल्याण मतदारसंघ आपल्या हाती राखणे भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते.

Eknath Shinde

पडद्याआडून ! शिंदेशाहीची सध्या आहे हवा!

आपल्या घरातील ठाणे, कल्याण मतदारसंघ ताब्यात कायम राखताना भविष्यातील राजकारणाचा पाया एकाएकी ढासळणार नाही, ही दक्षता घेण्यात शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तूर्त यशस्वी

आपल्या घरचा ठाण्याचा गड कायम राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde)यश मिळवले असल्याने सध्या येथे शिंदे शिवशाहीची हवा कायम आहे, असे म्हणता येईल. शिंदे यांच्या दृष्टीने ठाणे आणि कल्याण मतदारसंघ आपल्या हाती राखणे भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. मात्र, येथेही भारतीय जनता पक्षाने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मतदारसंघांवर भाजप ठामपणे दावा करत होती आणि ते आपल्याकडे यावे यासाठी पडद्याआडून बरेच प्रयत्न सुरू होते. कल्याण मतदारसंघ शिंदे सोडणार नाही हे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी तेथे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव निवडणूक लढवतील अशी घोषणा परस्पर केली. मात्र, ठाण्यावर भाजपचा डोळा लक्षात आल्याने शिंदे यांच्या पक्षाने श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा लांबणीवर टाकली. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी पार दिल्ली दरबारात बाजू लढवून दोन्ही मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवले आणि दोन्ही ठिकाणी शिंदेंचे उमेदवार विजयी झाले. दोन्ही मतदारसंघातील विजयात भाजपचा मोठा वाटा होता, ही बाब नाकारता येणार नाही. ठाण्यात शिवसेनेच्या दोन गटात निवडणूक होणार असली आणि उमेदवार कोणीही असले तरी खरी लढत ही मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात होती हे नक्की. सध्या तरी ठाण्याचा गढ शिंदेशाहीने कायम राखला आहे, असे म्हणता येईल.                

भाजपचा दावा का?

आणीबाणीच्या काळापासून या मतदारसंघावर नजर टाकली तरी भारतीय जनता पक्षाला येथे अनुकूल वातावरण असल्याचे दिसते. मूळचे भाजपचे पण जनता पक्षातर्फे निवडणूक लढवलेले रामभाऊ म्हाळगी हे १९७७ आणि १९८० मध्ये खासदार होते. १९८२ च्या पोटनिवडणुकीत भाजपचे जगन्नाथ पाटील, १९८९ आणि १९९१ मध्ये भाजपचे राम कापसे खासदार झाले होते. मधल्या काळात १९८४ मध्ये इंदिरा गांधी हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसचे शांताराम घोलप हे खासदार झाले होते. १९९० नंतर भाजप-शिवसेना युतीत बाळासाहेब ठाकरे यांनी हक्काने ठाणे मतदारसंघ मागून घेतला आणि त्यानंतर शिवसेनेचा या मतदारसंघावर एकछत्री अंमल सुरू झाला. बाळासाहेबांचे ठाणे शहरावर आणि ठाणेकरांचे बाळासाहेबांवर विलक्षण प्रेम होते. ते तसे बोलूनही दाखवायचे आणि त्याला ठाणेकरांचा प्रतिसादही तसाच उत्साही आणि भरघोस होता. १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांनी हा गड राखला. २००८ च्या पोटनिवडणुकीत आनंद परांजपे यांनी शिवसेनेसाठी विजय मिळवला होता. २००९ मध्ये मात्र राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांनी अनपेक्षित विजय मिळवला होता. २००९ मध्ये तिरंगी लढत झाली होती. कधी काळी शिवसेनेत असलेले गणेश नाईक त्यावेळी राष्ट्रवादीत आले होते. त्यांनी आपला मुलगा संजीव नाईक यांच्यासाठी त्यांची यंत्रणा राबवली. त्यावेळी शिवसेनेकडू विजय चौगुले आणि हवा असलेल्या मनसेचे राजन राजे रिंगणात उतरले होते. नाईक यांना ३ लाख १६ हजार, चौगुले यांना २ लाख ५१ हजार आणि राजन राजे यांना १ लाख ३५ हजाराच्या आसपास मते मिळाली होती. राजे यांना मिळालेली मते ही मूळची शिवसेनेची होती. त्याचा फटका त्यावेळी शिवसेनेला बसला होता. 

२०१४ आणि २०१९ मध्ये राजन विचारे यांनी शिवसेनेतर्फे विजय मिळवला होता. मोदी आणि पुलवामानंतरची देशप्रेमाची लाट या जोरावर त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. २०१४ मध्ये विचारेंना ५ लाख ९५ हजार तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना ३ लाख १४ हजार मते  मिळाली होती. मताधिक्य होते २ लाख ८१ हजार. २०१९ मध्ये विचारेंना विक्रमी ४ लाख १२ हजारांचे मताधिक्य होते. विचारेंना ७ लाख ४० हजार तर राष्ट्रवादीकडून उभे राहिलेले आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार मते मिळाली होती. २०२४ मध्ये शिंदे शिवसेना आणि ठाकरे सेना या मुळच्या शिवसेनेच्या दोन गटात निवडणूक झाली. शिंदे शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना ७ लाख ३४ हजार तर ठाकरे सेनेचे राजन विचारे यांना ५ लाख १४ हजार मते मिळाली. म्हस्केंचे मताधिक्य होते २ लाख १७ हजार.

चुरशीच्या लढती! 

२००४ मध्ये ठाणे मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली ती शिवसेनेचे प्रकाश परांजपे आणि राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांच्यात. यावेळी परांजपे जेमतेम २२ हजारांच्या फरकाने निवडून आले होते. यावेळी परांजपे यांना ६ लाख ३१ हजार मते पडली होती तर राष्ट्रवादीकडून उभे राहिलेले डावखरे यांना ६ लाख ९ हजार मते पडली होती. यापूर्वी १९९९  मध्ये झालेल्या तिरंगी लढतीतील परांजपेचा विजय अवघ्या ११ हजारांच्या फरकाचा होता. त्यावेळी शिवसेनेचे परांजपे यांना ३ लाख ९१ हजार, काँग्रेसचे नकुल पाटील यांना २ लाख ९१  हजार तर राष्ट्रवादीचे प्रभाकर हेगडे यांना १ लाख ७७ हजार मते पडली होती. या दोन निवडणुकांचा अपवाद केला तर बहुतेक लढतीतील मताधिक्य मोठे होते.      

राजकीय बलाबल

ठाणे लोकसभा राजकीय स्थितीवर नजर टाकली तर येथे भारतीय जनता पक्ष कसा बळकट आहे, हे स्पष्ट होते. माजिवाडामध्ये प्रताप सरनाईक, कोपरीमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (दोघेही शिंदे शिवसेना), ठाण्यात संजय केळकर, ऐरोलीत गणेश नाईक, नवी मुंबईत मंदा म्हात्रे तिघेही भाजप आणि मिरा भाईंदरमध्ये गीता जैन अपक्ष (गीताताई अपक्ष असल्या तरी त्यांचा भाजपकडेच कल ) अशी राजकीय स्थिती आहे. त्यामुळे ठाकरे सेनेला येथील निवडणूक अत्यंत प्रतिकूल राजकीय स्थितीत लढवावी लागली होती. ठाकरे सेनेचा एकही आमदार मतदारसंघात नव्हता. होते ते ठाकरे सेनेचे निष्ठावान मतदार. 

निष्ठावन मतदार कायम!

प्रतिष्ठेच्या ठाणे मतदारसंघात शिंदे सेनेने आपली चलती कायम असल्याचे दाखवून दिले असले तरी फुटीनंतर नेते, कार्यकर्ते हाती नसतानाही राजन विचारेंना पडलेली मते काही कमी नाहीत. ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे शिवसेनेवर निष्ठा असणारा मतदार मुळापासून ढासळला असल्याचे चित्र काही येथे दिसत नाही. २०१४ पासून विचारेंना मिळालेली मते पाच ते साडेसात लाखांच्या घरात आहेत. शिंदेची यंत्रणा आणि त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांची मनापासून मिळालेली साथ याच्या जोरावर म्हस्के दिल्लीत पोहोचले आहेत. यातून भाजपची ताकद आणि शिंदे शिवसेनेची दोन विधानसभा मतदारसंघातील ताकद लक्षात घेतली तरी म्हस्केंचा विजय हा शिंदे शिवसेनेचा निखळ विजय असल्याचे मानता येणार नाही.

नाईकांशी केला समेट

ठाणे मतदारसंघात आता भाजपमध्ये असलेले गणेश नाईक यांची आपली अशी मोठी ताकद आणि यंत्रणा आहे. शिवसेना आणि भाजप युती जेव्हा सत्तेवर होती तेव्हा नाईक मंत्रिमंडळात होते. त्यावेळी नाईक यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे शिवसेनेत तरुण होते. मात्र, त्यावेळीही ठाण्याच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड होती. सोबत आनंद दिघेंचा मोठा पाठिंबा होता. मात्र, तेव्हापासून ठाणे आणि जिल्ह्यावरील राजकारणावर पकड कोणाची यावरून नाईक-शिंदे यांच्यात मतभेद होते. पक्षातच त्यांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे डावपेच सुरू होते. उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या शिंदेंचे हळूहळू पक्षातील प्रस्थ वाढत असल्याचे पाहून आणि आपल्या राजकारणाला वेगळी दिशा असावी या हेतूने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीची उतरण पाहून त्यांनी नवी मुंबई आणि जिल्ह्यातील राजकारणावरील पकड कायम राहावी यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता ऐरोलीचे भाजपचे आमदार असलेले गणेश नाईक यांचा २०१४ मध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपले राजकारण पुढे चालू ठेवले. भारतीय जनता पक्षाच्या राज्य नेत्यांना प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने गणेश नाईक गटाचा पाठिंबा मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरले. ही शिंदे यांची यशस्वी चाल विजयांमध्ये कामी आली.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story