‘बाप का कर्ज चुकाया’!

सोलापूर लोकसभा निवडणुकीचा यावेळी लागलेला निकाल म्हणजे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या पराभवाचा घेतलेला बदला असे म्हणता येईल, किंवा बाप का कर्ज चुकाया असे फिल्मी स्टाईलमध्ये त्याचे वर्णन करता येईल. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे शरद बनसोडे आणि डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. 

Political News

संग्रहित छायाचित्र

सोलापूर लोकसभा निवडणुकीचा यावेळी लागलेला निकाल म्हणजे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या पराभवाचा घेतलेला बदला असे म्हणता येईल, किंवा बाप का कर्ज चुकाया असे फिल्मी स्टाईलमध्ये त्याचे वर्णन करता येईल. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे शरद बनसोडे आणि डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. 

२०१४ मध्ये काँग्रेसविरोधात असलेल्या लाटेवर स्वार होत भाजपचे शरद बनसोडे यांनी शिंदे यांना पराभूत केले होते. त्यावेळी बनसोडे यांना ५ लाख १७ हजारांच्या आसपास तर शिंदे यांना ३ लाख ६८ हजारांच्या आसपास मते पडली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी सुशीलकुमाचा यांचा या राखीव मतदारसंघात पराभव करताना १ लाख ७० हजारांच्या आसपास मते घेतली होती. विशेष म्हणजे, आंबेडकर यांचा हा काही मुळचा मतदारसंघ नाही. त्यांचा मुळचा मतदारसंघ अकोला असला तरी काँग्रेसविरोधात सुपारी घेतल्यासारखी त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे जयसिद्धेश्वर यांना ५ लाख २४ हजारांच्या आसपास तर सुशीलकुमारांना ३ लाख ३६ हजार मते पडली होती. यापूर्वी २००९ मध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी बनसोडे यांना पराभूत करत दिल्ली गाठली होती. त्यावेळी शिंदे यांना ३ लाख ८७ तर बनसोडे यांना २ लाख ८७ हजार मते पडली होती. यापूर्वी १९९६ मध्ये भाजपकडून लिंगराज वल्याळ तर २००३ च्या पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते पाटील विजयी झाले होते. या पोटनिवडणुकीत प्रतापसिंह यांच्या विजयाचे सारे श्रेय हे मोहिते पाटलांच्या यंत्रणेचे होते. वर उल्लेख केलेल भाजपचे विजय वगळता बहुतेकवेळा काँग्रेसने या मतदारसंघावर आपले वर्चस्व राखले आहे. 

२०२४ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमदेवार आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना पराभूत केले. प्रणिती यांना सव्वा सहा लाखांच्या आसपास तर सातपुते यांना ५ लाख ४६ हजारांच्या आसपास मते पडली. या मतदारसंघातील विधानसभा मतदार आणि तेथील आमदार पाहिले तर ही निवडणूक प्रणिती यांना एवढी सोपी नव्हती, हे लक्षात यावे. मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे यशवंत माने, सोलापूर उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे विजय देशमुख, सोलापूर दक्षिणध्ये भाजपचे सुभाष देशमुख, पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान औताडे, अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याणशेट्टी असे दिग्गज राम सातपुते यांच्या मदतीसाठी सारी ताकद लावून सज्ज होते. सोलापूर मध्य मतदारसंघात  काँग्रेसच्याच आमदार प्रणिती शिंदे निवडून आल्याने कागदावर ५ विरूद्ध १ असे राजकीय चित्र दिसत होते. कागदावर भाजपची बाजू भक्कम होती. सारे आमदार, पक्ष यंत्रणा सातपुतेंच्या  दिमतीला असताना प्रणिती शिंदे यांनी ठामपणे बाजू लावून धरली आणि विजय खेचून आणला. प्रणिती शिंदे यांच्या मागे मोहिते पाटलांची सारी यंत्रणा, काँग्रेसवरील मतदारांचा विश्वास ठामपणे उभा होता. दुसरीकडे २०१९ चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्याविषयी असणाऱ्या नाराजीचा फायदा प्रणिती यांना झाला. त्यातच त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत कोर्टकचेरी सुरू होती. सोलापूर जिल्ह्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दोन सभा घेऊनही जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा भाजपला गमवाव्या लागल्या. यावरून भाजप विषयी मतदारांत असणारी नाराजी लक्षात यावी. त्यातच माळशिरसचे आमदार असलेले राम सातपुते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील नसून बीड जिल्ह्यातील आहेत. एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. बीड जिल्ह्यातील पार्सल पुन्हा बीडकडे पाठवले जाईल अशीही वक्तव्ये प्रचारादरम्यान केली गेली. नाही म्हटले तरी स्थानिक विरूद्ध परप्रांतिय अशा प्रचाराचा परिणाम होतोच. भाजपनेही सामान्य कुटुंबातील उमेदवार विरूद्ध प्रस्थापित धनिकांच्या घरातील राजकन्या असा प्रचार केला. त्याचा फार परिणाम झाला नाही. संघटनात्मक संस्थाचे जाळे नसतानाही सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयी असणारा आदर, त्यांची एकंदर प्रतिमा याचाही प्रणिती यांच्या बाजूने अनुकूल वातावरण बनण्यास हातभार लागला. त्यामुळे विपरित राजकीय स्थिती असतानाही प्रणिती यांनी विजय खेचून आणला आणि सोलापूरवरील काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story