संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर आमने-सामने आले आहेत. मात्र, शरद पवारांनी चक्क मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांना बारामतीतील गोविंद बाग याआपल्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले आहे. आता गोविंद बागेतील घरामध्ये नक्की काय शिजणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांकडून अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे शरद पवारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरमरीत पत्र लिहून आम्हाला आमंत्रित केल्यास बारामतीनगरीत तुमचे स्वागत करायला आम्हाला आवडेल असे म्हटले आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
'या रोजगार मेळाव्याचं आमंत्रण मला अजून आले नाही. मात्र या कार्यक्रमाला बोलवलं तर मी नक्की जाणार आणि राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहे. या परिसरातील मी लोकप्रतिनिधी असल्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांचं स्वागत करावं आणि अतिथि देवो भवं, हे आपणाला आधीपासून शिकवले गेले आहे. या विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेत आतापर्यंत अनेक दिग्गज येऊन गेलेत. शरद पवारांच्या आमंत्रणानेच हे लोक इथे आले. त्यामुळे बोलवलं तर मी नक्की जाईन', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विद्या प्रतिष्ठान हायजॅक करण्याचा प्रयत्न ?
बारामतीत होणारा नमो महारोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना शासनाकडून निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे अजित पवारांकडून विद्या प्रतिष्ठान हायजॅक करण्याचा प्रयत्न चालू असल्याच्या चर्चा बारामतीत रंगू लागल्या आहेत. परंतु, शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून प्रतिष्ठान हायजॅक करण्याचा प्रयत्न चालू असल्याची चर्चाही बारामतीत रंगत आहे.
शरद पवारांच्या पत्रात नक्की काय ?
मुख्यमंत्री महोदय,
आपण ०२ मार्च, २०२४ रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सौ. सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच उक्तदिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. त्यासोबतच विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रित करतो. आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील 'गोविंदबाग' ह्या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील स्वीकार करावा. दोन्ही सस्नेह आमंत्रणांचा आपण स्वीकार कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.