रणसंग्राम २०२४: भाषण वळसे पाटलांचं, घोषणा मात्र शरद पवार झिंदाबादच्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणावेळी शरद पवार झिंदाबादच्या घोषणा ऐकावयास मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वळसे पाटील आले

संग्रहित छायाचित्र

भाषण सुरू असतानाच उपस्थित नागरिकांकडून शरद पवार झिंदाबाद अशी घोषणाबाजी

तानाजी करचे - 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणावेळी शरद पवार झिंदाबादच्या घोषणा ऐकावयास मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वळसे पाटील आले असताना शरद पवार गटाच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं. वळसे पाटील यांचे भाषण सुरू असतानाच उपस्थित नागरिकांकडून शरद पवार झिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे त्यांना काय प्रतिसाद द्यावयाचा हे समजेनासे झाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे पक्षचिन्ह बहाल केले. नुकतेच शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आलं आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे.

अशातच अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील पुण्याच्या आंबेगाव येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना शरद पवार गटाच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं. वळसे पाटील यांचे भाषण सुरू असतानाच उपस्थित नागरिकांकडून शरद पवार झिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी, जेवढं प्रेम तुमचं शरद पवार साहेबांवर आहे, तेवढंच प्रेम माझे देखील आहे. मी तर ४० वर्ष त्यांच्या सोबत काम केलं आहे. पण काही राजकीय परिस्थिती अशी असते, ज्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात, असे म्हटलं. हे काही राजकीय व्यासपीठ नाही आणि मी काही त्यावर बोलणारही नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

आंबेगाव येथील शिरूर तालुक्यातल्या पाबळ या गावात बैलगाडा शर्यतीसाठी वळसे पाटील यांनी हजेरी लावली होती. बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम संपल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी भाषण सुरू केलं. कालवा समितीच्या पाणी प्रश्नासंदर्भात वळसे पाटील बोलत होते. पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पाणीप्रश्न सोडवू, असे आश्वासन वळसे पाटील यांनी दिलं. मात्र त्याचवेळी लोकांनी शरद पवार झिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.  यावेळी वळसे पाटील म्हणाले  "तुमचं जेवढं प्रेम शरद पवार साहेबांवर आहे, तेवढच प्रेम माझं पण आहे. मी गेली ४० वर्ष शरद पवार यांच्या सोबत राहिलो आहे. काही राजकीय प्रश्न असतात, म्हणून असा निर्णय घ्यावा लागतो. मला त्याबद्दल बोलायचे नाही. ते आता मी इथे बोलत नाही. राजकीय सभेत राजकीय बोलू, पण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मार्ग कसा काढायचा याचा लवकरच निर्णय घेऊ," असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest