संग्रहित छायाचित्र
शिरुर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Loksabha Constituency) उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. आयात उमेदवार नको, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे केली आहे. यामुळे शिरुरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे खासदार डॉ.अमोल कोल्हेंना कोण आव्हान देण्यार याविषयी सध्या तरी अनिश्चितता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यांनीदेखील वरिष्ठांचा आदेश आला तर लोकसभा लढण्याची तयारी दाखवली होती. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील घेतली होती. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मात्र आयात उमेदवाराला साफ नापसंती दर्शवली आहे. शिरुर लोकसभेतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पराभूत करण्याचे खुले आव्हान अजित पवारांनी दिले आहे. त्याच दिवसापासून शिरुर मतदार संघात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत.
उमेदवारावरून रस्सीखेच सुरु असली तरीही आढळराव पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय बैठकीत घेतला होता. कार्यकर्त्यांची हीच इच्छा असल्याचेही ते म्हणाले होते.
मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर झालेल्या बैठकीबाबत ते म्हणाले होते की, अद्याप जागांचे वाटप झालेले नाही. अजित पवार म्हणतात त्यांचे मतदारसंघात आमदार जास्त आहेत. त्यामुळं त्यांनी या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले होते. त्यामुळं ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) तिकिटावर लढवण्याबाबत विचारणा झाली तर काय करायचं? अशी चर्चा बैठकीत झाली असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत सगळ्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयार दाखवली होती. मात्र आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आढळराव पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. त्यामुळे पुढे काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.