संग्रहित छायाचित्र
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत ईडीकडून ट्विटदेखील करण्यात आले आहे. या कारखान्याची १६१.३० एकर जमीन, प्लांट, यंत्र आणि इमारत इत्यादींवर जप्तीची कारवाई केली आहे. रोहित पवार यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत भाजपामध्ये जायला हवं का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. (Baramati Agro Company)
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याने (Kannad Sugar Factory) राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेकडून २०१२ साली कर्ज घेतलं होतं. मात्र, आर्थिक डबघाईमुळं कालांतराने कारखान्याचा लिलाव करण्यात आला. हा कारखाना रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो प्रा. लि. कंपनीनं ५० कोटी रुपयांना खरेदी केला. बारामती अॅग्रोबरोबरच हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. व अन्य एका कंपनीनं लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता. बारामती अॅग्रो कंपनीनेच २५ ऑगस्ट २०२२ रोजी हायटेक इंजिनिअरिंगला ५ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी हायटेक इंजिनिअरिंगने लिलावात भाग घेतला, असे बँक खात्याच्या तपासणीत आढळून आलं होतं. या प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होता.
बारामती अॅग्रोने कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेले पैसे प्रत्यक्षात खेळत्या भांडवलाची गरज भागवण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँकांकडून घेतले होते. मात्र, ते त्यासाठी न वापरता कारखाना खरेदी करण्यासाठी वापरले. बँकेकडून मिळालेले पैसे वळवण्याचा हा प्रकार दिसतो, असा ठपका ईडीनं ठेवला होता. मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं कन्नड सहकारी कारखान्याची जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे.
#लढेंगे_जितेंगे
#लढेंगे_जितेंगे असा हॅशटॅग देत एक्स अकाऊंटवर रोहित पवार यांनी म्हटले आहे की, माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नेच बघावीत! या कारवाईवरून आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, असं दिसतंय. माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं… झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये. प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचा थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.”