संग्रहित छायाचित्र
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक घडामोडी होत असतानाच सोमवारी भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात तासभर चर्चा झाली. या भेटीत शेलारांनी ठाकरेंना केंद्रीय नेतृत्वाचा निरोप दिल्याची चर्चा आहेत. राज ठाकरे यांचे निवासस्थान असणाऱ्या कृष्णकुंज बंगल्यावर ही भेट झाली. (BJP - MNS Alliance)
लोकसभा, मुंबई महापालिकेच्या निवडणुकावेळी भाजप मनसेला सोबत घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, 'माझा विषय वेगळा आहे. ज्यावेळी निवडणुकीवर बोलायचं आहे तेव्हा मी निवडणुकीवर बोलेन असे सांगून भाजप-मनसे युतीचा प्रश्न निकालात काढला. आशिष शेलार यांच्याशी झालेल्या भेटीवर, चर्चेवर त्यांनी बोलणे टाळले.
यापूर्वीदेखील राज ठाकरे, आशिष शेलार तसेच भाजप नेत्यांच्या भेटी झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने झालेली ही भेट लक्षणीय मानली जाते. त्यातच या भेटीत शेलारांनी राज ठाकरेंना केंद्रीय नेतृत्वाचा निरोप दिल्याचे सांगितले जाते. भाजपने लोकसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन भाजप या निवडणुकांना सामोरे जाऊ शकते. भाजपला मनसे हवी असली तरी त्यांचा टोकाचा प्रादेशिकवाद आणि उत्तर भारतीयांना असणारा विरोध राष्ट्रीय पातळीवर भाजपला अडचणीत आणणारा आहे. याबाबत मनसे काय भूमिका घेणार, यावर सगळी राजकीय गणितं अवलंबून आहेत.
भारतीय जनता पक्षामध्ये सध्या ज्या पद्धतीने इनकमिंग सुरू आहे, त्यावरून येनकेन प्रकारे संख्याबळ गाठण्याचे लक्ष्य दिसून येते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तर जाहीरच केलं की, जो येईल त्याला सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. एकूणच कुणासोबत युती तर कुणाला थेट पक्षप्रवेश, असे भाजपचे धोरण दिसते.
आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीनंतर मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे आणि भाजप नेत्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे दोघांमध्ये भेट झाली असेल. या भेटीतून लगेच युतीची चर्चा करण्यात अर्थ नाही. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज ठाकरेंची भेट झाली होती.
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे त्यांची भेट झाली असेल. या भेटीत राजकीय चर्चा झाली असेल तर आनंदाचीच बातमी आहे. मनसे आणि भाजप एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. ते एकत्र आले तर चांगलंच आहे. भाजपने नेहमीच बेरजेचे राजकारण केलेलं आहे. जवळपास तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.
फडणवीसांची भूमिका काय?
काही दिवसांपूर्वी एका मुलाखीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मनसेबरोबरच्या युतीवर भाष्य केलं होतं. आमची मैत्री आहे, परंतु, युतीवर चर्चा झालेली नाही, असं फडणवीस म्हणाले होते. तसेच आगामी काळात, निवडणुकीच्या वेळी राजकीय चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले होते. त्यावर आशिष शेलार म्हणाले, राजकारणात ज्याला कळते, तो समजून घेतो. आमचा राजकीय निर्णय निवडणुका घोषित झाल्यावर सर्वांना कळेल. लोकसभेआधी चित्र स्पष्ट होईल असं फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, तर तसेच होईल.
अब बात दूर तक चलेगी -शेलार
राज ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत आशिष शेलार म्हणाले की, राजकारणात नेत्यांच्या भेटी नेहमी होत असतात. मी आणि राज ठाकरे व्यक्तिगत आयुष्यात चांगले मित्र आहोत. तसेच राजकीय जीवनातही मैत्री असल्यामुळे आम्ही भेटत असतो. त्यामुळे अशा भेटींनंतर आम्ही साद घालायला गेलो होतो वगैरे बोलण्यात काही अर्थ नाही. अशा आशयाच्या बातम्या दाखवण्यातही काही अर्थ नाही. या भेटीत मन की बात झाली, जन की बात झाली, महाराष्ट्र की बात झाली. अब बात चलेगी तो बहुत दूर तक चलेगी.
भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मनसेबरोबरच्या युतीची चर्चा केली. आशिष शेलार नेतृत्वाचा निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटले, अशा बातम्या प्रसारित केल्या होत्या. यावर शेलार म्हणाले, मला वाटतं राजकारणात अशा भेटीगाठी होत असतात. नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होत असतात. अशा चर्चा झाल्या पाहिजेत. आमची व्यक्तिगत स्तरावरही चर्चा होत असते. या भेटीत काय झाले, त्याचा खुलासा योग्य वेळी केला जाईल. मनसेचं शिष्टमंडळ अलीकडेच आलं होतं, काही गोष्टी आमच्याकडूनही होत्या. त्यामुळे आमच्या भेटी झाल्या.