संग्रहित छायाचित्र
पुणे: मुख्यमंत्रिपदासाठी आपण हपापलेलो नाही, असा खुलासा करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी पक्षासह (NCP) सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात ठिकठिकाणी समर्थकांनी फ्लेक्स लावल्यानंतरही उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलेल्या अजित पवार बारामतीत आपला उमेदवार उभा करणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शुक्रवारी पुन्हा त्यांनी बारामतीमध्ये (Baramati) भावनिक आवाहन करताना शरद पवार गटाच्या संभाव्य आरोपांवर पलटवार केला. बंड का केले? बंडाच्या आधी आणि नंतर काय काय झाले, याची सर्व माहिती बारामतीकरांना दिली. आगामी निवडणुकीत माझ्या विरोधातील प्रचाराला बारामतीच्या जनतेनं उत्तर द्यावं, असेही आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिल्यावर ते प्रथमच बारामतीत आले होते.
बारामतीतील सभेत अजित पवार म्हणाले की, “आमचे वरिष्ठ (शरद पवार - Sharad Pawar) मध्यंतरी बोलले की मी राजीनामा देतो. आम्ही कुणीही राजीनामा मागितला नव्हता. वरिष्ठांच्या इच्छेनंतर आम्ही सर्वांनी बसून आताच्या खासदार (सुप्रिया सुळे - Supriya Sule) यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या इतर नेत्यांना आम्ही विश्वासात घेऊन हे मान्य केलं. दोन-तीन दिवसांत काय चक्र फिरली माहीत नाही, ते म्हणाले, मीच अध्यक्ष राहतो. आम्ही सातत्याने वरिष्ठांना सांगत होतो की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) बहुमत राहिले नाही तर आपण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पाठिंबा देऊ. त्यालाही विलंब झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मी मुख्यमंत्रिपदासाठी हपापलेलो नाही, असे स्पष्ट करून अजित पवार म्हणाले की, २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिक जागा येऊनही वरिष्ठांनी उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानले. त्यांचे आदेश शिरसावंद्य मानले. तेव्हाही मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हतो. तेव्हा आर. आर. पाटील किंवा छगन भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकले असते. कारण ते त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठे नेते होते. मी २०१० साली उपमुख्यमंत्री झालो.
... म्हणून सरकारमध्ये
सरकारमध्ये आपण कशासाठी सामील झालो हे स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्त्व असतं. आमच्या पक्षातील अनेक आमदारांनी सांगितले की, भूमिका घ्या, पण वरिष्ठ काही ऐकायला तयार नव्हते. उद्धव ठाकरे सरकार जेव्हा जाणार हे स्पष्ट झालं, तेव्हा माझ्या दालनात सर्व आमदारांनी सह्या करून आपण भाजपाबरोबर सरकारमध्ये जाऊ, असे मान्य केले. तेही (भाजपा) आम्हाला घ्यायला तयार होते, पण वरिष्ठांनी ऐकले नाही. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही पुन्हा वरिष्ठांना भेटून याबाबत विचारणा केली. वरिष्ठांनी उत्तर दिले नाही. शेवटी २ जुलै रोजी आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हे करताना आम्ही निवडणूक आयोगासमोर गेलो आणि आमची भूमिका मांडली.
राज्यातील बहुतेक जिल्हाध्यक्ष आमच्या बाजूने आले. कारण त्यांनाही कळत होते की, आम्ही घेतलेला निर्णय पक्षासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी घेतला आहे. वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केले तर आम्ही चांगले आणि मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष झालो तर चोर ठरलो का? म्हणजे वरिष्ठांच्या पोटी आम्ही जन्माला आलो असतो आम्ही चांगले. मग अध्यक्षही झालो असतो, पक्षही ताब्यात आला असता. शेवटी सख्या भावाच्या पोटीच जन्माला आलो ना. म्हणून सांगतो लोकसभा निवडणुकीत काही लोक भावनिक करतील, त्याकडे लक्ष देऊ नका. केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांच्या विचाराचा खासदार केंद्रात गेला तरच बारामतीकरांची राहिलेली कामे पूर्ण होतील. बारामती-फलटण रेल्वेचे काम पूर्ण होईल. त्यामुळे बारामतीकरांनी केंद्र सरकारच्या विचारांचा खासदार निवडून द्यावा. त्यामुळे पक्ष चोरला असं जे म्हणत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
फक्त सेल्फी काढत नाही
अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचा उल्लेख टाळून निशाणा साधला. ते म्हणाले की, आपण काम करतो, फक्त सेल्फी काढत फिरत नाही, भाषण करून संसदपटू किताब मिळवल्याने कामे होत नाहीत . पार्लमेंटमध्ये नुसते भाषणं केल्यावर प्रश्न सुटत नाहीत. पार्लमेंटमध्ये भाषणं करून मी जर आता इथं न येता मुंबईत बसून भाषणं करून, उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं कामं बघीतलीच नसती तर कामं झाली असती का, अशा शब्दात अजित पवारांनी अनेक वेळा संसदपटू हा किताब मिळवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. माझं सांगणं आहे की मनात संभ्रम ठेवू नका. अजून पण काहींना वाटतंय की हे एकत्र होतात की काय, आपल्यालाच बनवत आहेत असे वाटेल. आम्ही स्पष्ट सांगून पण ऐकलं जात नाही. बारामतीकरांनो मी तुम्हाला सांगतो, आता ते घरातील वरिष्ठ एकमेव आहेत. दुसरे आहेत, ते पुण्यात असतात. त्यामुळे मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एवढंच सांगायचं आहे की बाकीचे सगळे माझ्या विरोधात गेले तर हे (समोर बसलेले लोक) माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे आपण विनंती करायची, ती करू. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, प्रचारस्वातंत्र्य आहे. आपल्याला देशात एनडीएचं सरकार आणायचं आहे. त्या सरकारच्या माध्यमातून आपला मतदारसंघ, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. त्याकरिता माणूस किंवा व्यक्ती निवडून देऊन प्रश्न सुटत नाहीत. सकाळी कामाची पाहणी करण्यासाठी मी जेव्हा जातो, तेव्हा अनेक आया-बहिणी, पुरुष मंडळी शुभेच्छा देतात. त्यांच्या तक्रारी मी ऐकून घेतो.