रणसंग्राम २०२४: ‘मावळ लोकसभा जिंकायचीच’

मावळ: देशात हुकूमशाही रोखण्यासाठी आणि संविधान, लोकशाही टिकविण्यासाठी लोकसभेतील प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसह महाविकास आघाडीला मावळसह सर्व ४८ जागा जिंकायच्या आहेत.

Maval Loksabha Constituency

संग्रहित छायाचित्र

मावळ: देशात हुकूमशाही रोखण्यासाठी आणि संविधान, लोकशाही टिकविण्यासाठी लोकसभेतील प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसह महाविकास आघाडीला मावळसह सर्व ४८ जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी प्रयत्नांची शर्त करा, असे आवाहन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी  केले.  

शिवसेनेच्या (Shivsena UBT) मावळ लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांचा मेळावा ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये झाला. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. मेळाव्यास पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन आहिर, युवा सेनेचे पदाधिकारी आदित्य शिरोडकर, मावळचे समन्वयक केशरनाथ पाटील, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड, मावळ संपर्कप्रमुख लतिका पाष्टे, शहर प्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, अनिता तुतारे, शहर युवा अधिकारी चेतन पवार, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले , महाशक्तीला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. महाराष्ट्राचा निकाल हा देशाला दिशा देणारा ठरणार आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी फोडली. त्या हुकूमशाही प्रवृत्तीस आणि खोके सरकारला धडा शिकविण्याची संधी ही निवडणूक देत आहे. गेल्या दहा वर्षांत काय काम केले हे न सांगता, काँग्रेसच्या ६५ वर्षांच्या काळात काहीही झाले नाही, अशी टीका ते करीत आहेत. ओबीसी, धनगर, मराठा समाजात तसेच, जाती-धर्मात भांडणे लावून निवडणूक जिंकण्याची त्याची जुनी प्रवृत्ती आहे. शेतकरी आंदोलन चिरडले जात आहे. मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. अंधभक्त आणि संविधानाच्या बाजूने असलेल्या मधल्या लोकांना हे समजावून सांगा. हाऊसिंग सोसायट्या, कॉलनी, वस्त्या, मंडळ, संस्था तसेच, ग्रामीण भागांतील सर्व नागरिकांना भेटून त्यांना आपली भूमिका आणि वचननामा सांगा. त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घ्या. खोपोलीपासून मतदार यादीचा आढावा घेण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात येणाार आहे, असे आदित्य शिरोडकर म्हणाले. तुषार नवले यांनी आभार मानले.

कसब्याप्रमाणे मावळ जिंका- आहिर

शिवसेनेत फूट नव्हती. ते एक षडयंत्र होते. मुंबईसह महाराष्ट्राला दिशा देणार्‍या शिवसेना संपविण्याचा त्याचा विडा होता, हे सर्वांना आता समजले आहे. जे गेले त्याच्यासोबत केवळ ठेकेदार गेले. पिंपरी-चिंचवड व मावळात कोणीही त्यांच्यासोबत गेले नाही. गद्दारांना गाडण्याची संधी या निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना मिळाली आहे. ज्याची हवा गेली ते चला हवा येऊ द्या करत आहेत. वन नेशन वन इलेक्शन म्हणणारे महापालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुका घेण्यास घाबरत आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणूक जशी महाविकास आघाडीने जिंकली, त्याप्रमाणे मावळ लोकसभा जिंकायची आहे, असे सचिन आहिर म्हणाले .

विजय आपलाच - संजोग वाघेरे-पाटील 

मावळ लोकसभेतील प्रत्येक भागांना भेटी देण्यात येत आहेत. आतापर्यंत ८५ टक्के भाग पिंजून काढला आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असून, त्यांच्या भावना तीव्र आहेत. गद्दारांना धडा शिकविण्यासाठी ते पेटून उठले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मावळात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय साकारणार आहे, असे संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांनी स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest