संग्रहित छायाचित्र
कागल: 'शाहू' ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज (मंगळवार) कागल येथील ऐतिहासिक गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आदी उपस्थित होते.
समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशासाठी मेळावा तसेच सभेचे आयोजन करण्यात आले होते. घाटगे यांच्या पक्ष प्रवेशासाठी स्वत: शरद पवार हे उपस्थित राहिले.
2016 मध्ये समरजितसिंह घाटगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु 2019 मध्ये कागलची जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे घाटगे अपक्ष लढले. त्यावेळी त्यांनी 88 हजार मते घेतली मात्र हसन मुश्रीफ यांच्याकडून घाटगेंचा पराभव झाला. यंदा ते भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक होते. मात्र राष्ट्रवादीत फुट पडून अजित पवार गट भाजपासोबत गेल्याने पुन्हा एकदा पंचाईत झाली. काहीच दिवसांआधी अजित पवार कागलमध्ये आलेले असताना त्यांनी मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर समरजितसिंह घाटगे काय करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. शेवटी घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला