चिंचवडबाबत वरिष्ठ तोडगा काढतील; आमदार पंकजा मुंडे यांनी साधला पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद
चिंचवड विधानसभेसाठी भरपूर जण इच्छुक असले तरीही तिढा असा काही नाही. प्रत्येक वेळी भाजप मार्ग काढतोच, आम्हाला इच्छुकांची यादीतून एकाचे नाव द्यावे लागते. याची प्रॅक्टिस कोअर कमिटीला आहे, ते यातून तोडगा काढतील. भाजपच्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या विधानसभांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हा संघटनेचा दौरा असल्याने इतर राजकीय काही बोलणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मंगळवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप, सदाशिव खाडे, नामदेव ढाके आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी गेल्या २० वर्षांत शहरात विकासाचा पाया रचल्याने चिंचवड मतदारसंघात पुन्हा पक्षाचाच आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता लक्ष्मणभाऊंचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे, त्यासाठी चिंचवडच्या मैदानावर उतरून प्रत्येकाने आजच आपली जबाबदारी सांभाळा, मैदान आपणच जिंकू, अशा शब्दात आमदार पंकजा मुंडे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या. यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, गेल्या वर्षभरात संघटनात्मक कार्यातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सूरू आहे. विश्वकर्मा योजना, लाडकी बहिण योजना, युवा प्रशिक्षण योजनांमधून नागरिकांचा भाजपा वरील विश्वास वाढला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम सूरू आहे. जनतेच्या या विश्वासावर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय पटकावला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा झेंडा मोठया मताधिक्याने फडकविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींनी माफी मागून विषय संपवला
पंकजा मुंडे म्हणाल्या, मालवण घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या क्षणी माफी मागितली आहे, महाराजांवरील खरे प्रेम त्यातून व्यक्त केले. काही घटना अशा घडतात, त्यावरून राजकारण करू नये. मात्र मोदींनी माफी मागून आदर्श दाखवून दिला, यातून विरोधकांनी प्रेरणा घ्यावी. मोदीजींनी वक्तव्य केल्यानंतर कोणी काही वक्तव्य करण्याचे कारण नाही. कोणी काहीही बोलले, त्यावर मी बोलावे असे मला वाटत नाही.