वडगाव शेरीमध्ये महायुतीत फूट? सुनील टिंगरे-जगदीश मुळीक यांच्यातील शीतयुद्ध गंभीर वळणावर

पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर असून वर्तमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे आणि माजी आमदार भाजपचे जगदीश मुळीक यांच्यातील शीतयुद्ध गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्तमान आमदार पुन्हा लढण्याची दाट शक्यता; पंकजा मुंडे यांना भेटून माजी आमदार मुळीक भाजपकडून तिकीट मागणार, मागणी मान्य न झाल्यासपक्ष सोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी

पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर असून वर्तमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे आणि माजी आमदार भाजपचे जगदीश मुळीक यांच्यातील शीतयुद्ध गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात कोणाला तिकीट द्यावे, या मुद्दयावरून येथे महायुतीत फूट पडणार असल्याचे बोलले जात आहे.

२०१९ च्या निवडणुकीत येथून एकत्रित राष्ट्रवादीतर्फे सुनील टिंगरे यांनी बाजी मारली होती. त्यापूर्वी २०१४ मध्ये शिवसेनेकडून लढलेले टिंगरे आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार बापू पठारे यांचा पराभव करीत जगदीश मुळीक यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर मुळीक यांच्याकडे शहराध्यक्षपददेखील सोपवण्यात आले होते. २०१९ मध्ये पराभूत झालेल्या मुळीक यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. मात्र, केंद्रात आणि राज्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे. सध्या येथे राष्ट्रवादीचे टिंगरे हे आमदार असल्याने त्यांनाच येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत  भाजपकडून तिकीट न मिळाल्यास माजी आमदार जगदीश मुळीक हे पक्षविरोधात जाऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या टिंगरे यांच्याशी दशकभर चाललेले शीतयुद्ध आणि टिंगरे हे राष्ट्रवादीचे तिकीटही मिळवू शकतात अशी शक्यता निर्माण झाल्याने मुळीक यांनी हे पाऊल उचलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुळीक यांना आपल्या कामावर विश्वास असून तिकीट मिळाल्यास वडगाव शेरीत भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले की, ‘‘आम्ही पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी करणार आहोत.”

मुळीक यांच्या पवित्र्यामुळे महायुती आता कोसळण्याच्या मार्गावर असून यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे, तसेच मुळीक यांची जागा कोण घेणार असाही प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

३०० कोटीच्या विकास प्रकल्प सोहळ्याच्या पोस्टरवरून वादात भर
मुळीक आणि टिंगरे यांच्यातील शीतयुद्ध सुरु असतानाच ताज्या वादाने यात भर पडली आहे. ३०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्प सोहळ्यासाठी टिंगरे यांच्या पोस्टर्समध्ये फक्त अजित पवार यांचा समावेश करण्यात आला होता, यावर मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली होती. टिंगरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीच्या विविध सदस्यांनी या प्रकल्पांचा पाठपुरावा केला होता, मात्र, टिंगरे यांनी त्यांचे योगदान बाजूला ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे मुळीक यांनी निदर्शनास आणून दिले.

यासंदर्भात मुळीक म्हणाले, ‘‘वडगाव शेरीत काय फक्त भाजप आणि शिवसेनेनेच महायुतीची तत्त्वे जपली पाहिजेत का? प्रत्येक घटक पक्षाने युतीची तत्त्वे जपली पाहिजे. मात्र काही आमदारांना याचा विसर पडला आहे.’’

टिंगरे म्हणतात, मतभेद नाहीत
मात्र, टिंगरे यांनी महायुतीत फूट पडण्याची शक्यता फेटाळून लावताना आमच्यात कसलेही मतभेद नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘‘आमचा पक्ष आणि भाजपच्या नेत्यांमध्ये या मतदारसंघात शीतयुद्धाचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकांच्या काही आकांक्षा असू शकतात आणि त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केल्यास काहीही नुकसान होणार नाही. मी तुम्हाला खात्री देतो, महायुतीमध्ये कसलेही मतभेद नाही. आणि पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेतील, तो सर्व पक्षांसाठी बंधनकारक असेल.’’

...तर वडगाव शेरीत भाजपमध्ये मोठी फूट
मुळीक यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर पक्षात जाण्याचा किंवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. या भागातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुळीक यांच्यासोबत असल्याने त्यांनी बंड केल्यास येथे पक्षात मोठी फूट पडू शकते. याआधीच एकजुटीच्या प्रश्नावर झगडत असलेल्या महायुतीलाही या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest