संग्रहित छायाचित्र
शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Loksabha Constituency) उमेदवारीवरून राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव यांच्यात चुरस आहे. निवडणूक लढविण्यावर आढळराव ठाम आहेत. मात्र, मंगळवारी रात्री भेटीसाठी गेले असता आढळरावांना बाहेर ताटकळत ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याची चर्चा आहे. यामुळे शिरूर मतदारसंघात नक्की चालले काय आहे? याची चर्चा सुरू झाली आहे.
शिरुर मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यासाठी महायुतीमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत चर्चेसाठी मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली. उमेदवारीसाठी भेटण्यासाठी आलेले शिरूर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आढळराव पाटलांना बाहेर ताटकळत ठेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंद दाराआड चर्चा झाली. शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. ते शिरूर लोकसभा लढविण्यावर ठाम आहे. आहेत. परंतु, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुर मतदारसंघावर दावा केलेला आहे.
शिरूर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे राखण्यासाठी महायुतीने चंग बांधला आहे. त्यामुळेच या मतदारसंघावर दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या आढळरावांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन शांत बसवण्यात आल्याची चर्चा होती. तरीही आढळरावांनी अद्यापही उमेदवारीची आशा सोडली नाही. कारण या मतदारसंघावर दावा केलेले अजित पवार कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आढळराव ‘वर्षा’ वरुन बाहेर ?
शिरुर लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी वर्षा बंगल्यावर शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यासह जुन्नर तालुक्यातील नेतेमंडळी उपस्थित होती. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आणि मतदारसंघातील इतर नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आढळराव आणि इतरांना बाहेर ठेवून बंद दाराआड दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांच्याशी चर्चा केली. या प्रकारानंतर आढळराव पाटील वर्षा बंगल्यावरुन सहकाऱ्यांसह बाहेर पडले.
राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटासोबत गेले. त्यांनी अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. जन आक्रोश मोर्चे काढले. त्यामुळे नाराज झालेल्या अजित पवारांनी त्यांना पाडण्याचा चंग बांधला आहे. अमोल कोल्हे यांच्यासाठी आपण गेल्या निवडणुकीमध्ये जीवाचं रान केलं, आता या निवडणुकीत त्यांना पाडणार म्हणजे पाडणार अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीनेच लढविण्यावर ते ठाम आहेत. सध्या भाजपमध्ये असलेले जिल्ह परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचे नावही उमेदवारीसाठी चर्चेत आहे.
‘आढळराव राष्ट्रवादीमध्ये आल्यास मी घरी बसेन’
आढळराव पाटील यांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश दिला जाणार असेल तर मी माझा निर्णय घेईन, असं वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे. आढळरावांचे स्वागत करायचं की नाही हा जर-तरचा भाग आहे. आम्ही आयुष्यभर त्यांना विरोध केला आहे. त्यामुळे मी राजकारण करण्यापेक्षा घरी बसेन. पक्ष त्यांचं स्वागत करणार असेल तर मी त्यावर काही बोलणार नाही. शेवटी पक्ष आणि पक्षप्रमुख त्यांचा निर्णय घेतील. परंतु, मी माझे वैयक्तिक निर्णय घेऊन, काय करायचं हा निर्णय घेईन. ज्यांनी मला तुरुगात डांबण्यापर्यंत, मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेतली, प्रयत्न केले, त्यांच्याबरोबर काम करायचं किंवा नाही करायचं ते मी ठरवेन.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आमची पूर्व नियोजित बैठक होती. त्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. आपल्याकडे अशा चर्चा होत राहतात. शिरूर लोकसभेसाठी मी गेल्या पाच वर्षापासून तयारी करत आहे. मी शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे.
- आढळराव पाटील