पुणे: शक्तीप्रदर्शन करत महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज केले दाखल

पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवाजीराव आढळराव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले.

Lok Sabha Election 2024

संग्रहित छायाचित्र

पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवाजीराव आढळराव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले.

पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोहोळ यांनी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कर्वे रस्त्याने डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार मेधा कुलकर्णी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आदी यावेळी उपस्थित होते. या रॅलीसाठी तयार केलेला रथ सहभागी झाला होता.

मोहोळ म्हणाले, घराण्याची कोणतीही राजकीय परंपरा नसताना भाजपने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठेवण्याचा प्रयत्न मी करेन. देशाचे नेतृत्व कोणाच्या हातात द्यावयाचे यासाठी ही निवडणूक आहे. मोदी सरकारने गेल्या १० वर्षात अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून पुणेकरांसाठी काम केले.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून  रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे, एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांच्यात लढत होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरून खासदार अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही. शिरूमधून शिवाजी आढळराव पाटील यांना नव्हे तर, छगन भुजबळांना उमेदवारी देण्याचा प्लॅन होता. त्यामुळेच ते उपस्थित राहिले नाहीत.

विजय निश्चित, पण ज्योतिषी नाही- अजित पवार

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आढळराव पाटील हेच निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. मात्र, आढळरावांना किती मताधिक्य मिळेल, या प्रश्नावर मी काही ज्योतिषी नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest