देवेंद्र फडणवीसांचा खासदार कोल्हेंवर हल्लाबोल; म्हणाले, नाटक फ्लॉप निघाल्यावर लोक बघायला जात नाही...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका करत त्यांचा उल्लेख 'नाटकी' असा केला.

Devendra Fadanvis

देवेंद्र फडणवीसांचा खासदार कोल्हेंवर हल्लाबोल; म्हणाले, नाटक फ्लॉप निघाल्यावर लोक बघायला जात नाही...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका करत त्यांचा उल्लेख 'नाटकी' असा केला. यावर खासदार कोल्हे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंधरा वर्षे देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटील यांनी अतिशय उत्तम काम केलं. किती प्रश्न विचारले याची यादी बघा.आढळराव पाटलांनी सातत्याने संघर्ष केला. बैलगाडा शर्यत सुरू करण्यामागे आढळराव यांचे प्रयत्न आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काहीही झालं नाही. आपलं सरकार परत आलं आणि त्यानंतर आपण बैलगाडा शर्यत सुरू केली. आढळराव पाटील यांच्यावर पक्ष बदलल्याचा आरोप लावला जातो. परंतु सत्य सांगितलं पाहिजे.अजित पवार,  एकनाथ शिंदे आणि मी एकत्रित बसलो. जगावाटप झाल्यानंतर शिरूरची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. शिवसेनेनेही या जागेसाठी आग्रह धरला होता. शेवटी मधला मार्ग काढला.  राष्ट्रवादीच्या कोट्यात गेलेल्या जागेवर आढळराव पाटील यांना उमेदवारी देवू.  त्यामुळे दोन्ही पक्षांना समाधान वाटेल. त्यामुळे आढळराव पाटील यांनी पक्ष बदललेला नसून आम्ही तिघेही एका विचाराने एकत्र आलो आहोत.

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टिका करताना फडणवीस म्हणाले, कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात किती निष्ठा बदलल्या, किती फेसबुक पोस्ट टाकल्या, ते कुठे कुठे जाणार होते, ते कसे कसे थांबले हे सांगण्यास सुरवात केल्यावर त्यांचा खरा चेहरा उघड होईल. ते नाटक करण्यात सरस आहेत. ते नाटकी आहेत. त्यांना नाटक जमतं. हसता येतं. रडता  येतं. चुगलेबाजी करता येते. लोकं नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक बघायला जातात. पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कुणीही नाटक बघायला जात नाही. गेली पाच वर्षे कोल्हे मतदारसंघात फिरकले नाही. शिरूरचे लोक हुशार आहेत. आता गावोगावी जाणाऱ्या कोल्हे यांना लोक विरोध करत नाही. शिव्या घालत नाही. लोक त्यांना बोलवतात. त्यांचं स्वागत करतात. त्यांना हार घालतात, सत्कार करतात. समोरच्याला वाटतं माझं काय स्वागत झालं.त्यानंतर लोक विचारतात  मागील पाच वर्षे कुठे होता? 

फडणवीस म्हणाले, ही निवडणूक स्थानिक नसून देशाचा नेता निवडण्याची आहे. देशाला विकासाकडे कोण नेवू शकतो? देश मजबूत कोण करू शकतो? जनसामान्यांच्या आकांक्षा कोण पूर्ण करू शकतो? याची ही निवडणूक आहे. देशातील राजकीय पक्ष दोन गटांत विभागले गेले आहेत. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीत विविध पक्ष एकत्र आले असून दुसऱ्या बाजूला राहुल गांधी असून त्यांच्या नेतृत्वाखाली २४ पक्षांची खिचडी आहे. महायुती विकासाची ट्रेन असून मोदी हे इंजिन आहेत. तसेच विविध पक्षांचे डब्बे जोडले आहे. तर दुसरीकडे केवळ इंजिनच असून त्यांच्याकडे डब्बे नाहीत. सर्वसामान्यांसाठी जागा ही मोदी यांच्या इंजिनच्या डब्यात आहेत. मोदी यांनी देशात मागील १० वर्षांत चमत्कार केलेत, असे फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest