सांगता सभेत शरद पवारांनी केले लेकीला पाठिंबा देण्याचे आवाहन; म्हणाले, बारामतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष

कान्हेरीतील सभेवेळी एक युवक आला होता, बहुधा तो पत्रकार असावा, त्या सभेचे वार्तांकन करण्यासाठी तो अमेरिकेतून आला असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे बारामतीची निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची असून या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले

Baramati Loksabha Constituency

संग्रहित छायाचित्र

कान्हेरीतील सभेवेळी एक युवक आला होता, बहुधा तो पत्रकार असावा, त्या सभेचे वार्तांकन करण्यासाठी तो अमेरिकेतून आला असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे बारामतीची (Baramati Loksabha Constituency) निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची असून या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा (शरद पवार गट) शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी बारामतीमध्ये सांगितले. 

बारामतीमध्ये ७ मे रोजी मतदान होत असून प्रचाराच्या समारोपावेळी म्हणजे रविवारी (दि. ५) शरद पवार, अजित पवार या दोन्ही गटांच्या सभा झाल्या. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने बारामतीत सकाळपासूनच सभांचा धडाका सुरू होता. यावेळी पवार विरुद्ध पवार हा सामना रंगला. 

शरद पवारांचा आवाज बसला असतानाही त्यांनी सांगता सभेत जोरदार भाषण करत बारामतीकरांना साद घातली. प्रचाराची वेळ सहाला संपणार असल्याने पवारांनी भाषण आवरते घेतले. ही सभा बारामतीमधील मोरगाव रोडवरील लेंडीपट्टी येथील क्रिकेट मैदानावर पार पडली. नेहमीची सभेची जागा अडवण्यात आली असली तरी काही नुकसान होणार नसल्याचे सांगत शरद पवार यांनी टीका टिप्पणी करणे टाळले. पवार म्हणाले,  देशात मोदी यांची सत्ता असली तर आपण बारामतीकर जोपर्यंत एक आहोत, तोपर्यंत आपल्याला कोणीच काही करू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पाठीशी नेहमीप्रमाणे उभे राहावे. अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ते सांगतात माझी अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख आहे. मी म्हणते ओळख आहे तर करा ना त्यांना फोन. सोडवा कांद्याचा प्रश्न. तुम्ही ज्यांना घाबरता त्यांच्यासमोर आम्ही दिल्लीत भाषण करतो.

सुप्रिया सुळे सात तारखेनंतर बारामतीत दिसणार नाहीत, अशी टीका करण्यात येत होती. या टीकेला सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले. माझे बारामतीत घर आहे. मात्र मी बारामतीत येते की नाही हे विचारणारे १८ वर्ष पालकमंत्री होते. ते किती वेळा दुसऱ्या तालुक्यात गेले. देवेंद्र फडणवीसांबरोबर हॅलिकाॅप्टरने यायचे आणि हॅलिकाॅप्टरने जायचे. जमिनीवर काय चाललंय हे माहीतच नाही, असाही टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लगावला.

रोहित पवारांना अश्रू अनावर

सांगता सभेत रोहित पवारांना (Rohit Pawar) शरद पवार यांच्या एका विधानाची आठवण झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. रोहित पवार म्हणाले की, पक्ष फुटला त्यावेळी आम्ही काही पदाधिकारीही पवार साहेबांसोबत होतो. ते टीव्ही पाहात होते. मात्र दुःख चेहऱ्यावर दिसू दिले नाही. त्यावेळी त्यांनी सांगितले, तुम्ही काळजी करू नका. आपल्याला स्वाभिमानी महाराष्ट्र घडवायचा आहे. तो घडवत असताना किंवा तो घडवण्यासाठी आपल्याला नवी पिढी घडवायची आहे. ती नवी पिढी जबाबदारी घेत नाही, किंवा त्या पिढीत जबाबदारी पेलण्याची क्षमता येत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवारसाहेबांचे शब्द होते. याची आठवण होताच रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest